जनजातीय गौरव दिन : आदिवासी अस्मिता, संघर्ष आणि शाश्वत विकास

Jalna Nayak    14-Nov-2026
Total Views |
  
जनजातीय गौरव दिन
 
 
प्रा. प्रियदर्शन भवरे 
 
जनजातीय गौरव दिन दरवर्षी १५ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आदिवासी स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारने २०२१ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील उलिहातू येथे त्यांचा जन्म झाला. आदिवासी समाजात त्यांना 'धरती आबा' म्हणून ओळखले जाते. त्यांनी ब्रिटिश वसाहतवादी सत्ता, जमीनदारी शोषण आणि आदिवासींच्या जमिनी बळकावण्याच्या धोरणांविरुद्ध संघर्ष केला. १८९९-१९०० मध्ये त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उलगुलान (महान उठाव) चळवळीचे नेतृत्व केले. आदिवासी समाजात स्वाभिमान, एकता, सांस्कृतिक अस्मिता आणि सामाजिक परिवर्तनाची जाणीव निर्माण करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश वसाहतवादी सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध संघर्ष केला. आदिवासींच्या पारंपरिक जमिनी आणि नैसर्गिक संसाधनांवरील अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी जनजागृती केली.१८९९-१९०० मध्ये त्यांनी ब्रिटिश सत्ता, जमीनदार आणि सावकारांच्या शोषणाविरुद्ध 'उलगुलान' (महान उठाव) चळवळीचे नेतृत्व केले. या आंदोलनाने आदिवासींच्या स्वायत्ततेचा आणि हक्कांचा प्रश्न ऐतिहासिक पातळीवर उपस्थित केला.आदिवासींच्या पारंपरिक सामूहिक जमीनव्यवस्थेचे संरक्षण आणि बाहेरून आलेल्या जमीनदारांकडून होणारे शोषण रोखण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या आंदोलनाचा पुढे छोटानागपूरमधील जमीनविषयक कायदे आणि संरक्षणात्मक उपायांवर प्रभाव पडला.त्यांनी आदिवासी समाजात अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि सामाजिक अनिष्ट प्रथांविरुद्ध जागृती केली. स्वच्छता, नैतिकता, सामाजिक एकता आणि स्वाभिमान यांचा संदेश दिला.आदिवासींची स्वतंत्र संस्कृती, परंपरा, जीवनपद्धती आणि सामाजिक ओळख यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी लोकांना संघटित केले.त्यांच्या संघर्षाने आदिवासी समाजामध्ये राजकीय जागृती निर्माण केली. वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी, ९ जून १९०० रोजी रांची तुरुंगात त्यांचे निधन झाले.
बिरसा मुंडा यांचे कार्य केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धचे बंड नव्हते, तर ते जमीन, संसाधने, सांस्कृतिक अस्मिता, सामाजिक न्याय आणि आदिवासी स्वायत्ततेसाठीचे व्यापक सामाजिक आंदोलन होते. त्यांच्या नेतृत्वाने आदिवासी समाजाच्या सामूहिक अस्मितेला आणि प्रतिकाराच्या जाणिवेला नवी दिशा दिली.बिरसा मुंडा यांचा संघर्ष आपल्याला शिकवतो की, विकासाच्या प्रक्रियेत कोणत्याही समुदायाची जमीन, संस्कृती, ओळख आणि मानवी प्रतिष्ठा हिरावून घेतली जाऊ नये.भारतीय इतिहासात बिरसा मुंडा यांच्यासह सिद्धू-कान्हू, फुलो-झानो, तिलका मांझी यांसारख्या अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी वसाहतवादी सत्ता आणि शोषणाविरुद्ध संघर्ष केला. मात्र, स्वातंत्र्यानंतरही विस्थापन, नैसर्गिक संसाधनांवरील अधिकारांचे हनन, सामाजिक बहिष्करण आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रश्न कायम आहेत.आदिवासी समाजाकडे केवळ मागासलेला किंवा मुख्य प्रवाहापासून वेगळा असलेला समाज म्हणून पाहणे चुकीचे आहे. त्यांच्याकडे स्वतंत्र ज्ञानपरंपरा, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि समाजजीवनाला अधिक समताधिष्ठित व निसर्गपूरक बनविण्याची क्षमता आहे.त्यामुळे जनजातीय गौरव दिनानिमित्त आदिवासींच्या इतिहासाचे गौरवीकरण करण्याबरोबरच त्यांच्या वर्तमानातील प्रश्नांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. त्यांची अस्मिता, प्रतिष्ठा, स्वायत्तता, सांस्कृतिक अधिकार आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करणे ही केवळ शासनाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. आदिवासींच्या अनुभवांचा आणि ज्ञानाचा सन्मान करणारा समाजच खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक, समताधिष्ठित आणि शाश्वत समाज ठरू शकतो.
जनजातीय गौरव दिन हा केवळ आदिवासी अस्मितेचा आणि अभिमानाचा उत्सव नाही, तर भारतीय समाजाच्या सभ्यता, संस्कृती आणि राष्ट्रउभारणीच्या प्रक्रियेत आदिवासी समुदायांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. आदिवासी समाज हा निसर्गाशी सहजीवनाचे नाते जोडून जगणारा समाज आहे. जल, जंगल आणि जमीन यांच्याशी असलेले त्यांचे नाते केवळ उपजीविकेपुरते मर्यादित नसून ते त्यांच्या जीवनपद्धतीचा, संस्कृतीचा आणि सामूहिक अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे. निसर्गाचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, सामूहिक संसाधनांचा विवेकपूर्ण वापर आणि पर्यावरणीय समतोल राखण्याच्या त्यांच्या पारंपरिक ज्ञानातून शाश्वत विकासाची महत्त्वपूर्ण तत्त्वे आपल्याला शिकायला मिळतात.भारतीय इतिहासात आदिवासी समुदायांनी वसाहतवादी सत्तेविरुद्ध, शोषणाविरुद्ध आणि अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध सातत्याने संघर्ष केला आहे. बिरसा मुंडा यांच्यासह अनेक आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान हे स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण पर्व आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतरही विस्थापन, विकासाच्या नावाखाली होणारे शोषण, संसाधनांवरील अधिकारांचे हनन, सामाजिक बहिष्करण आणि सांस्कृतिक अस्मितेचा प्रश्न या समुदायांसमोर कायम आहे.