ऊसतोड कामगारांसोबत शिवसेनेची दिवाळी; दिवाळीच्या शिध्याचे वाटप

    14-Nov-2026
Total Views |



डोलखेडा खुर्द येथे शिवसेनेचा सामाजिक उपक्रम; जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या हस्ते शिधा वितरण

जाफराबाद, जि. जालना : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि ऊसतोड कामगार आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर गरजू कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, या सामाजिक भावनेतून शिवसेनेच्या वतीने जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा खुर्द येथे ऊसतोड कामगारांना आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या हस्ते ऊसतोड कामगारांना दिवाळी शिध्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी भाऊसाहेब घुगे यांनी स्वतः कामगारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर आणि कामगार वर्गाच्या हाताला काम मिळणे कठीण झाले असून अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा संकटाच्या काळात कष्टकरी वर्गाने खचून जाऊ नये, त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतकरी आणि कष्टकरी बांधवांच्या सुख-दुःखात प्रत्यक्ष सहभागी होणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि गरजेच्या वेळी मदतीचा हात देणे हीच सामाजिक बांधिलकी आहे, अशी भूमिका भाऊसाहेब घुगे यांनी यावेळी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीच्या प्रत्येक प्रसंगी गरजूंना मदत करण्यात येत आहे. ऊसतोड कामगारांच्या कुटुंबीयांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामुळे ऊसतोड कामगारांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रवीण फुके, तालुकाप्रमुख दत्ता बंगाळे, राजू परिहार, परमेश्वर मोरे, शिवाजी डोईफोडे, सरपंच मनीषा गजानन डोईफोडे, अशोक पंढरीनाथ डोईफोडे, समाधान डोईफोडे, गणेश डोईफोडे, सुभाष डोईफोडे, श्रीराम डोईफोडे, गणराज वाघ, तुळशीराम डोईफोडे यांच्यासह शिवसैनिक आणि ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संकटात शेतकरी-कष्टकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना!
दुष्काळाच्या संकटात शेतकरी, शेतमजूर आणि ऊसतोड कामगार आर्थिक अडचणीत आहेत. अशा वेळी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. डोलखेडा खुर्द येथे ऊसतोड कामगारांना आनंदाचा शिधा वाटप करून त्यांच्या दिवाळीत आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कष्टकरी बांधवांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच माझी भूमिका आहे.
— भाऊसाहेब घुगे
शिवसेना जिल्हाप्रमुख, जालना