बॅकफूट पंच
डॉ संदीप दुर्गा नानाभाऊ नागरे
डॉ नागरे डायबेटीस, ओबेसिटी अँड थायरॉईड
रिमिशन सेंटर, छत्रपती संभाजीनगर
विरेंद्र सेहवाग भारतीय संघात आला होता तेंव्हा सुरुवातीला तो खाली खेळायचा.. काही दिवसांनी वन डे मध्ये सचिनसोबत ओपनिंगला यायला लागला तेंव्हा बऱ्याच जणांना स्ट्राईक वर कोण आहे हे व्यवस्थित ओळखूही यायचं नाही इतके ते सारखे दिसायचे व खेळायचे सुद्धा!
सेहवाग आणि सचिनला दुरून खेळतांना ओळखायची एकच ट्रिक होती.. ती म्हणजे जो फलंदाज पाय चालवितांना दिसेल तो सचिन आणि जो जाग्यावरून मारेल तो सेहवाग!
हा आर्यवीर सेहवाग मला विरेंद्र सेहवाग आणि विराट कोहलीचे कॉम्बिनेशन वाटतोय.. त्याची बॉडी लँग्वेज त्याच्या वडिलांची आणि पाय कोहलीचे वाटताहेत!
मी फार जास्त त्याला अजून बघितलं नाहीये पण पोरगा बापाचं नाव काढेल अशी लक्षणे दिसताय..
आज त्याला सुरुवातीलाच हाताला बॉल लागला होता..एल्बोला बॉल लागल्यावर देव आठवतो हे लेदर बॉल खेळणाऱ्यालाच समजू शकतं..
पट्ठ्या तरीही बाहेर गेला नाही यावरून त्याची जिद्द आणि मेंटल टफनेस कळाली..
या बाळाचे पाय पाळण्यात नुसते दिसत नाहीयेत तर पळतांना दिसताय हे भारतीय क्रिकेटसाठी आणि सेहवाग फॅन्ससाठी आनंदाची गोष्ट आहे!
सचिन निवृत्त झाल्यानंतर मी मॅचेस लाईव्ह बघणं बंद केलं होतं म्हणजे ज्याला खेळतांना एकही चेंडू बघणं मिस करू नये असा कोणताही फलंदाज सचिन नंतर मला वाटला नाही..
कोहलीही माझा आवडता खेळाडू आहे पण तो खेळतोय म्हणून कितीही इम्पॉर्टन्ट काम असलं तरी सोडून जावं असं कधी वाटलं नाही..
सध्या माझा एकंच आवडता खेळाडू आहे ज्यासाठी मी काम सोडून मॅच बघू शकतो तो म्हणजे वैभव सूर्यवंशी..
या पोरालाही बघतांना तीच फिलिंग होती!
विरेंद्र सेहवागमध्ये अजून दोन तीन वर्षे क्रिकेट बाकी होतं असं समजणाऱ्यांची संख्या (धोनी सोडून ) बऱ्याच जणांची होती आणि त्यात मीही होतो!
खूप जणांची इच्छा असली की तेच होतं असं म्हणतात.. आता परत एकदा 'सेहवाग' लवकरच निळ्या जर्सीत दिसणार हे नक्की आहे फक्त यात एक नवीन ऍडिशन असणार आहे ती म्हणजे यापुढे आपल्याला "पाय चालविणारा सेहवाग" दिसणार आहे!
भविष्यात आर्यवीर आणि सूर्यवंशी ओपन करतील तेंव्हा परत सगळं सोडून टीव्हीसमोर बसावंच लागेल असं आत्ताच वाटायला लागलंय!
जय हिंद!