भोकरदनच्या वाईन शॉपीतील मद्यविक्रीवर संशय; चौकशीची मागणी?

Jalna Nayak    15-Nov-2026
Total Views |

वाईन शॉपी
 
 
रिटेल परवाना असताना घाऊक पद्धतीने विक्री होत असल्याचा आरोप; संशयास्पद मद्याच्या साठ्याची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी
 
भोकरदन : भोकरदन शहरातील वाईन शॉपीमधील मद्यविक्रीच्या पद्धतीवरून सध्या शहरात चर्चेला उधाण आले आहे. संबंधित दुकानातून संशयास्पद अथवा बोगस मद्याची विक्री होत असल्याचा आरोप केला जात असून, किरकोळ विक्रीसाठी (रिटेल) परवाना असताना मोठ्या प्रमाणात घाऊक पद्धतीने मद्यविक्री केली जात असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने लक्ष घालून सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
मद्यविक्रीचा व्यवसाय हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियंत्रणाखाली येत असून, मद्याची खरेदी, साठवणूक, वाहतूक आणि विक्री यासाठी शासनाने नियम व परवान्यांची व्यवस्था निश्चित केली आहे. घाऊक आणि किरकोळ विक्रीसाठी स्वतंत्र परवाना व्यवस्था असल्याने संबंधित दुकानाकडे नेमका कोणत्या प्रकारचा परवाना आहे आणि त्यानुसार विक्री केली जात आहे का, याची तपासणी होणे आवश्यक आहे.
संबंधित वाईन शॉपीमधील काही मद्याच्या बाटल्यांच्या दर्जाबाबत आणि अधिकृततेबाबत संशय व्यक्त केला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बाटल्यांवरील सील, लेबल, बॅच नंबर, उत्पादनाची माहिती तसेच उत्पादन शुल्क भरल्याच्या नोंदींची पडताळणी करण्याची मागणी होत आहे. मद्य बनावट किंवा भेसळयुक्त असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यास हा प्रकार ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब ठरू शकतो.
याशिवाय, किरकोळ विक्रीसाठी असलेल्या दुकानातून मोठ्या प्रमाणात एकाच वेळी मद्याची विक्री होत असल्याचा आरोपही चर्चेत आहे. संबंधित बर्जर दुकानातून मद्य कोणाला, किती प्रमाणात आणि कोणत्या पद्धतीने विकले जाते, याची माहिती तपासणे गरजेचे आहे. यासाठी दुकानाचे स्टॉक रजिस्टर, खरेदीची बिले, पुरवठादारांची माहिती, वाहतूक परवाने आणि विक्रीच्या नोंदी तपासल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.
 
अचानक तपासणी करून सत्य समोर आणा!
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधित वाईन शॉपीची अचानक तपासणी करावी. दुकानातील प्रत्येक ब्रँडच्या मद्याच्या बाटल्यांची तपासणी करून बॅच नंबर, सील, लेबल आणि अधिकृत पुरवठ्याच्या नोंदी पडताळाव्यात. तसेच दुकानाच्या परवान्यानुसारच मद्यविक्री होत आहे की नाही, याचीही खातरजमा करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
 
दरम्यान, शहरात गंभीर स्वरूपाचे आरोप आणि चर्चा सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. केवळ चर्चेपुरते हे प्रकरण मर्यादित न राहता सक्षम अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून अहवाल जनतेसमोर आणावा. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.