मनःशांती, सकारात्मक विचार आणि आत्मपरिवर्तन हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र : ब्रह्माकुमारी शिवानी दीदी

तीन दिवसीय मोफत जीवन परिवर्तन शिबिराचे आयोजन

Jalna Nayak    16-Nov-2026
Total Views |

शिवानी दीदी
 
 
शिवानी दीदींच्या ज्ञानामृतमय विचारांनी जालनेकरांना मिळाली सुखी जीवनाची गुरुकिल्ली; तीन दिवसीय मोफत जीवन परिवर्तन शिबिराचे आयोजन
  
संकलनः ब्रह्माकुमारी कविता नरवडे
 
जालना : चिंता, तणाव आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे आज माणूस भौतिकदृष्ट्या संपन्न होत असला, तरी मानसिकदृष्ट्या कमकुवत होत चालला आहे. अशा परिस्थितीत मनाचे स्वास्थ्य जपणे, सकारात्मक विचारांची जोपासना करणे आणि स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणे हाच सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे, असे मौलिक प्रतिपादन विश्वप्रसिद्ध आध्यात्मिक गुरू व प्रख्यात वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांनी केले. त्यांच्या निर्मळ, मधुर आणि प्रभावी वाणीने जालनेकरांना सुखी, समाधानी व आनंदी जीवनाची गुरुकिल्ली मिळाली.
 
ब्रह्माकुमारीज संस्थेच्या माध्यमातून आलेल्या आध्यात्मिक अनुभूतीनंतर माजी मंत्री राजेश टोपे  यांच्या मनात शिवानी दीदी यांच्यासारख्या महान आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाचे विचार जालन्यातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प निर्माण झाला. समाजात सकारात्मक दृष्टिकोन रुजावा, प्रत्येक व्यक्तीने मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व जाणावे आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलावी, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी राजयोग भवन संचालिका स्व. सुलभा दीदी यांचाही शिवानी दीदी यांचा कार्यक्रम जालन्यात व्हावा, असा संकल्प होता.
 
आपल्या मार्गदर्शनात शिवानी दीदी म्हणाल्या की, आज प्रत्येक व्यक्ती आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेते; मात्र मनाचे आरोग्य जपण्याकडे दुर्लक्ष करते. शरीराप्रमाणेच मनाचे स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रतिकूल परिस्थिती बदलणे नेहमीच आपल्या हातात नसते; मात्र त्या परिस्थितीत आपली मनःस्थिती कशी ठेवायची, हे निश्चितपणे आपल्या नियंत्रणात असते. त्यामुळे इतरांना आपल्या दुःखाचे कारण न ठरवता स्वतःच्या विचारांचे आणि भावनांचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.
 
स्वतःला सकारात्मक सूचना  देऊन आपण स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो. मनामध्ये चांगल्या संकल्पांचे बीज पेरले, तर त्यातून सद्गुणांची निर्मिती होते. स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तनाचा मार्ग प्रशस्त होतो. यासाठी त्यांनी उपस्थितांकडून विविध योगप्रात्यक्षिके आणि मानसिक सक्षमीकरणाचे सराव करून घेतले. प्रतिकूल परिस्थितीतही मनाची एकाग्रता आणि स्थिरता टिकवून ठेवली, तर अशक्य वाटणारी कामेही सहज शक्य होतात. यशस्वी जीवनासाठी स्थितप्रज्ञता अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
कुटुंबात आणि समाजात सुख-शांती नांदण्यासाठी परस्परांमध्ये सामंजस्य, मधुर संवाद, आदर आणि सन्मान असणे आवश्यक आहे. इतरांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. आज मोबाईल हे उपयुक्त साधन असले, तरी त्याच्या अतिवापरामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ नये. मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून आपल्या कुटुंबाला आणि नातेसंबंधांना पुरेसा वेळ दिला पाहिजे. आपल्या सुखाचे रिमोट कंट्रोल वस्तू, वैभव आणि संपत्ती यांच्या हातात देणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.
 
जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करताना त्यांनी नकारात्मक शब्दप्रयोग टाळून सकारात्मक संकल्प करण्याचे आवाहन केले. शेतकरी बांधवांनी संयम राखून पीक उत्पादन वाढविण्यासाठी योगिक शेतीचा अवलंब करावा. प्रत्येकाने आपले व्यवसाय आणि नोकरी निष्ठेने करावी. आपण सर्वांनी एकत्रितपणे पाण्याची पातळी वाढविण्याचा संकल्प केला, तर निश्चितच सकारात्मक बदल घडू शकतो. कारण 'संकल्प से सृष्टि बनती है', हा विचार त्यांनी मांडला.
 
पर्यावरणाचे संवर्धन केले, तर निसर्गही आपल्याला भरभरून देईल. आकाश, हवा, पाणी, अग्नी आणि पृथ्वी या पंचमहाभूतांपासून मानवी शरीराची निर्मिती झाली आहे. त्यामुळे या पंचतत्त्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जालना ही एकेकाळी समृद्धीने नटलेली 'सोने का पालना' नगरी होती. पुन्हा समृद्धी निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक विचार आणि कृतीचा संकल्प केला पाहिजे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
 
कलियुगात नकारात्मक प्रवृत्ती वाढत असताना प्रत्येकाने आपल्या श्रेष्ठ संकल्पांमधून सुवर्णयुगाची सुरुवात स्वतःपासून करावी. इतरांमधील दोष शोधण्याऐवजी स्वतःतील सद्गुण विकसित करावेत. वाईटातून चांगले, निंदेतून स्तुती आणि दुःखातून सुख शोधण्याची सकारात्मक वृत्ती अंगीकारावी. प्रत्येकाविषयी शुभभावना ठेवाव्यात. देहभानापलीकडे जाऊन प्रत्येकाकडे आत्मस्वरूप म्हणून पाहिल्यास ईर्षा, द्वेष, मत्सर आणि मोह यांसारख्या नकारात्मक भावना कमी होण्यास मदत होते. 'सर्वे भवन्तु सुखिनः' या भावनेतून सर्वांच्या कल्याणाचा विचार केला, तर जीवन निश्चितच आनंददायी बनेल, असा संदेश त्यांनी दिला.
 
तीन दिवसीय मोफत जीवन परिवर्तन शिबिराचे आयोजन
यावेळी शिवानी दीदी यांनी जालनेकरांसाठी तीन दिवसीय निःशुल्क प्रेरणादायी जीवन परिवर्तन शिबिराची माहिती दिली. मंठा चौफुली येथील प्रियंका रेसिडेन्सी येथे सकाळी ८ ते ९ आणि सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिल्ली येथील प्रसिद्ध राजयोगिनी विधात्री दीदी या शिबिरात राजयोगाचे मार्गदर्शन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर राजयोग अभ्यासक्रम घेणाऱ्या विधात्री दीदी यांचे मार्गदर्शन जालनेकरांना लाभणार असल्याने नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन शिवानी दीदी यांनी केले.
 
नूतन राजयोग भवन संचालिका शीतल दीदी आणि बऱ्हाणपूर झोन इनचार्ज राजयोगिनी मंगला दीदी यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आध्यात्मिक विचार, राजयोग आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमातून जालनेकरांना आत्मचिंतनाची आणि जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली.