दौलत बाबा यांच्या रहस्यमयी मृत्यूचे गूढ, त्या मोबाईलमध्ये दडलंय काय..? मोबाईलच उलगडणार मृत्यूचे सत्य!

Jalna Nayak    17-Nov-2026
Total Views |
​
पाताळेश्वर संस्थानाचे मठपती श्री देवेंद्र चैतन्य स्वामी ऊर्फ दौलत बाबा
 
 
मोबाईल महाराजांनी स्वतः फेकला की इतर कोणी? तपास यंत्रणांसमोर मोठा प्रश्न.
विशाल अस्वार
​
वालसावंगी:भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव येथील पाताळेश्वर संस्थानाचे मठपती श्री देवेंद्र चैतन्य स्वामी ऊर्फ दौलत बाबा (४१) यांच्या रहस्यमयी मृत्यूचे गूढ आता एका मोबाईलभोवती येऊन ठेपले आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या एका बारवेतून (विहिरीतून) पोलिसांनी स्वामींचा मोबाईल हस्तगत केला आहे. आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, हा मोबाईल महाराजांनी स्वतः आत्महत्या करण्यापूर्वी बारवेत फेकून दिला होता की घातपात करून इतर कोणी पुरावा नष्ट करण्यासाठी तो तिथे फेकला? या प्रश्नाचे उत्तर आणि मोबाईलमधील डेटाच आता मृत्यूचे खरे सत्य उलगडणार आहे.
​नेमकी घटना काय?
​सावंगी येथील पाताळेश्वर संस्थानात बालययोगी देवेंद्र चैतन्य स्वामी यांचा राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी सकाळी आढळून आला होता. स्वामींनी आत्महत्या केली की हा घातपात होता, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असतानाच स्वामींचा मोबाईल गायब असल्याचे निदर्शनास आले होते.
​बारवेतून मोबाईल काढला; पण तो तिथे गेला कसा?
​पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गायब झालेल्या मोबाईलचे लोकेशन शोधले असता, ते घटनास्थळापासून अवघ्या ४० फूट अंतरावर असलेल्या एका बारवेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी चार बारवांचे पाणी उपसून अखेर सोमवारी स्वामींचा मोबाईल बाहेर काढून जप्त केला.
​या घटनेमुळे तपासाची चक्रे वेगाने फिरली आहेत
​जर स्वामींनी आत्महत्या केली असेल, तर त्यांनी स्वतःचा मोबाईल बारवेत का फेकला?
​आणि जर हा घातपात असेल, तर मारेकऱ्यांनी ओळख लपवण्यासाठी किंवा महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी तो मोबाईल बारवेत फेकून दिला का? 
 
​सीडीआर आणि संपर्कांची चौकशी
​पाण्यात पडल्यामुळे हा मोबाईल सध्या बंद अवस्थेत आहे. तो तांत्रिक मदतीने सुरू करून स्वामींना शेवटचे कोणाचे फोन आले होते आणि काय संवाद झाला, याची माहिती पोलीस घेणार आहेत.  पोलीस या मोबाईलचा सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) रिपोर्ट काढणार असून, स्वामींच्या संपर्कातील व्यक्तींचे जबाब नोंदवणार आहेत. ​दरम्यान, रविवारी संध्याकाळीच स्वामींच्या पार्थिवावर याच परिसरात अनुयायांच्या मोठ्या गर्दीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र, स्वामींच्या मृत्यूचे खरे रहस्य त्या बंद मोबाईलमध्ये आणि तो बारवेत फेकणाऱ्या हातांच्या शोधात दडलेले असून, पोलीस तपासातून काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.