शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप; जालन्यात शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक

Jalna Nayak    18-Nov-2026
Total Views |
 
शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक
 
जालना: शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शायना एनसी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने बुधवारी (दि. १८) जालना शहरात जोरदार निषेध आंदोलन केले. शहरातील गांधी चमन परिसरात कार्यकर्त्यांनी शायना एनसी यांच्या प्रतिमेला 'जोडो मारो' आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला.शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद जालन्यात उमटले असून, महिला आघाडीप्रमुख रूपम घुगे आणि शहरप्रमुख दीपक रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी शायना एनसी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. "शायना एनसी यांनी पुढील २४ तासांत जाहीर माफी मागावी, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी," अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. जाहीर माफी न मागितल्यास त्यांना महाराष्ट्रभर फिरू दिले जाणार नाही आणि त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा रूपम घुगे व दीपक रणनवरे यांनी दिला आहे.या आंदोलनात जनार्दन गिराम, तुळशीराम काळे, बाबुराव कायंदे, संतोष क्षत्रिय, शेख वसीम यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.