दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष खपवून घेणार नाही
अंबड तहसील कार्यालयात तालुकास्तरीय दुष्काळ आढावा बैठक; पाणीटंचाई, वीजपुरवठा, बोअरवेल अधिग्रहणासह शासकीय योजनांचा घेतला आढावा
घनसावंगी - अंबड तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन त्या तातडीने सोडवाव्यात. जनतेच्या प्रश्नांबाबत कोणत्याही प्रकारची प्रशासकीय दिरंगाई अथवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार हिकमत उढाण यांनी दिला.
अंबड तहसील कार्यालयात आमदार हिकमत उढाण यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय दुष्काळ आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तालुक्यातील पाणीटंचाई, शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी, वीजपुरवठा, बोअरवेल अधिग्रहण, महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी आमदार उढाण यांनी उपस्थित शेतकरी, नागरिक आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, आवश्यकतेनुसार बोअरवेल अधिग्रहणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, तसेच शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याबाबत भेडसावणाऱ्या अडचणी त्वरित दूर कराव्यात, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत त्याला शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत. पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळाला पाहिजे. महसूल, कृषी, पंचायत समिती आणि महावितरण विभागाने परस्पर समन्वय ठेवून काम करावे. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्पर राहावे, असेही आमदार उढाण यांनी स्पष्ट केले.
दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटाचा सामना करताना प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. प्रशासनाला आवश्यक असलेले सहकार्य, साधने आणि पाठबळ उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत. मात्र, प्रशासनानेही जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध राहून नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा देणे हीच सध्याच्या परिस्थितीत प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे आमदार उढाण यांनी नमूद केले.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार संतोष मोहिते, गटविकास अधिकारी ज्योत्स्ना कडदिवे यांच्यासह तालुका प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते, महसूल, पंचायत समिती, महावितरण व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शेतकरी बांधव, ग्रामस्थ आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.