तक्रारी मागे घेण्यासाठी १० ते २५ हजार रुपयांची मागणी केल्याचा संघटनेचा गंभीर आरोप; संबंधित व्यक्तीविरुद्ध चौकशी करून कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
भोकरदन : भोकरदन तालुक्यासह जालना जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांविरोधात वारंवार तक्रारी दाखल करून दुकानदार आणि प्रशासनाला मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केला आहे. तडेगाव येथील विष्णू विठ्ठल गोफणे हे विविध गावांतील स्वस्त धान्य दुकानदारांविरोधात तक्रारी दाखल करून उपोषणाची धमकी देत असल्याचे तसेच तक्रारी मागे घेण्यासाठी संबंधित दुकानदारांकडे १० ते २५ हजार रुपयांची मागणी करीत असल्याचे संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार ई-पॉस मशीनद्वारे शासनाच्या निर्धारित दराने आणि प्रमाणानुसार पात्र लाभार्थ्यांना धान्य वितरण करतात. मात्र, कमिशन वेळेवर मिळत नसतानाही दुकानदार आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे. अशा परिस्थितीत काही व्यक्तींकडून दुकानदारांविरोधात वारंवार तक्रारी केल्या जात असल्याने दुकानदारांमध्ये भीती आणि मानसिक तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीचा अनेक गावांतील स्वस्त धान्य दुकानांशी किंवा त्या गावांतील लाभार्थ्यांशी थेट संबंध नसतानाही विविध गावांतील दुकानदारांविरोधात तक्रारी दाखल केल्या जातात. तक्रारींची चौकशी करण्याची मागणी करत उपोषणाचा इशारा दिला जातो. त्यानंतर संबंधित दुकानदारांशी वैयक्तिक संपर्क साधून तक्रार मागे घेण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच, काही दुकानदार गावातील गटबाजी, राजकीय वाद किंवा वैयक्तिक त्रासाच्या भीतीने तडजोड करतात. त्यानंतर संबंधित व्यक्ती प्रशासनाला लेखी पत्र देऊन तक्रार मागे घेत असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. यासंदर्भातील काही तक्रारी आणि तक्रार मागे घेतल्याची पत्रे निवेदनासोबत जोडल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
तक्रारींची दखल घेण्यास प्रशासनाकडून विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधातही तक्रारी करण्याची तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांसह शासकीय अधिकारीही मानसिक दबावाखाली काम करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने जिल्हाधिकारी, जालना यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित व्यक्तीची पोलीस पार्श्वभूमी तपासावी, विविध पोलीस ठाणे व शासकीय कार्यालयांतील नोंदींची पडताळणी करावी आणि पैशांची मागणी केल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. आरोप सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्ती व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, स्वस्त धान्य दुकानांमध्ये अनियमितता किंवा गैरप्रकार झाल्यास संबंधित गावातील पात्र रेशनकार्डधारकांनी स्वतः पुढे येऊन रेशनकार्डच्या पुराव्यासह तक्रार करावी. अशा तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषी दुकानदारांवर कारवाई करण्यास संघटनेचा विरोध नसल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. आता जिल्हा प्रशासन या गंभीर आरोपांची कितपत दखल घेते आणि चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे स्वस्त धान्य दुकानदारांचे लक्ष लागले आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष जगन्नाथ थोटे, तालुकाध्यक्ष विश्वासराव गाढे, सचिव कैसर शेख, उपाध्यक्ष गणेश ठोंबरे, सहसचिव राजु भालेराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.