बांगलादेशीला 'मीरचंदानी' दाखवून ३००० एकर हडपण्याचा कट!
मेहगाव जमीन संघर्ष समितीचा पत्रकार परिषदेत आरोप
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, ८ सदस्यीय समितीकडून विभागीय चौकशी
जालना / प्रतिनिधी
भोकरदन तालुक्यातील मेहगाव शिवारातील २५०० ते ३००० एकर जमीन हडपण्यासाठी भू-माफियांनी बांगलादेशी व्यक्तीला मूळ मालक भासवून बनावट आधार-पॅनवर दस्त नोंदविल्याचा आरोप मेहगाव जमीन संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. विरेंद्र देशमुख यांनी केला आहे. गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही खळबळजनक माहिती दिली. यावेळी शेती करणारे शेतकरी, महिला आणि पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आलेले नागरिक उपस्थित होते.
अॅड. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मेहगाव शिवारात भरत चेलाराम मीरचंदानी यांच्या नावावर अंदाजे २५०० ते ३००० एकर जमीन आहे. त्यांच्या आरोपानुसार, ते मागील ५० वर्षांत गावात किंवा शेतात आलेच नाहीत. परिणामी ही जमीन मेहगाव, धावडा, वडाळी परिसरातील शेतकऱ्यांच्या ताब्यात असून त्यावर त्यांच्या कुटुंबाची उपजीविका आहे. त्यांनी आरोप केला की, ही जमीन हडपण्यासाठी भू-माफियांनी नियोजनबद्ध कट रचला. एका बांगलादेशी व्यक्तीला मीरचंदानी असल्याचे भासवून बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड तयार केले. त्याआधारे खरेदीखताचा दस्त नोंदविला. ती व्यक्ती पळून गेल्यामुळे पुन्हा दुसऱ्या बांगलादेशी व्यक्तीला त्याच नावाने भासवून दुसरे आधार व पॅन कार्ड तयार करून संपूर्ण जमिनीचे अधिकार पत्र नोंदवून घेतले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या सर्व दस्तांमधील आधार क्रमांक, पॅन क्रमांक, स्वाक्षरी, अंगठ्याचे ठसे आणि फोटो वेगवेगळे आहेत.
अॅड. देशमुख यांनी आरोप केला की, भू-माफियांच्या अर्जावर भूमिअभिलेख कार्यालयाने तात्काळ मोजणी सुरू केली, तर पारध पोलिसांनी माफियांच्या कारवाईला संरक्षण दिले. ७ सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक ५० एसआरपीएफच्या बंदोबस्तासह शेतात आले, शेतकऱ्यांना जमीन खाली करण्याचा दबाव टाकला, अटकेची धमकी दिली. त्यानंतर ७० ते ८० शेतकऱ्यांवर नोंदविल्याचा आरोप त्यांनी केला.
रमेश शामराव गवळी आणि शाम जगन्नाथ माकोडे यांना बनावट नोंदी आणि खोट्या अहवालामुळे १७ दिवस जेलमध्ये रहावे लागल्याचा आरोपही त्यांनी केला. गजेंद्र लक्ष्मण साळवे यांनी १८ ऑक्टोबर रोजी तक्रार दिली असता पोलिसांनी आधी नकार दिला, पोलीस अधीक्षक, जालना यांच्या आदेशानंतरच तक्रार स्वीकारली, पण आरोपींवर कारवाई झाली नाही, असे त्यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून ही जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन करावी आणि संबंधित भूमाफियांवर तसेच भूमिअभिलेख अधिकारी व पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अॅड. विरेंद्र देशमुख यांनी यावेळी केली.
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती
या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले असून मुख्यमंत्र्यांनी विभागीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात भूखंड घोटाळे वाढले
जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भूखंड घोटाळे मागील काही वर्षांपासून सातत्याने समोर येत आहे. भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आणि शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडांची खरेदी विक्री केली जात असल्याचे प्रकरणे वाढली आहे.