जालना (प्रतिनिधी) : जालना महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधील लिकेज आणि परिसरातील अस्वच्छतेच्या समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी महापालिका प्रशासनाला जाब विचारला. महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांचे शहराकडे लक्ष नसल्याने शहराची अवस्था बकाल झाली आहे. आयुक्तांनी शहराकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत पांगारकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, आयुक्तांनी सोमवारी एका बैठकीचे आयोजन केले होते मात्र दोन चार नगरसेवकांच्या उपस्थितीत ही बैठक गुंडाळण्यात आली. पांगारकर यांनी बैठकीसंदर्भात उशिरा कळविण्यात आल्याचा आरोपही पांगारकर यांनी केला आहे.
जालना महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी शहरातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीपुरवठ्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 ते 16 मधील नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत प्रत्येक प्रभागातील समस्या आणि नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.दरम्यान, नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी यापूर्वीच महापालिकेच्या सभागृहात प्रभाग क्रमांक 13 मधील पाईपलाईन लिकेज, घाणीचे साम्राज्य तसेच इतर नागरी समस्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, वारंवार मागणी करूनही अद्याप या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.बैठकीचे नियोजन आणि वेळ कमी असल्यामुळे सर्व समस्यांवर सविस्तर चर्चा करता आली नाही, अशी नाराजीही पांगारकर यांनी व्यक्त केली. प्रभागातील नागरिकांना पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांसाठी त्रास सहन करावा लागत असताना प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रभाग क्रमांक 13 मधील प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अन्यथा नागरिकांच्या प्रश्नांसाठी महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी दिला आहे.