जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्यांतून ५ नोव्हेंबरपासून पहिले आवर्तन सुरू करणार

जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Jalna Nayak    02-Nov-2026
Total Views |

जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
 
छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी प्रकल्पाच्या पैठण डाव्या व उजव्या कालव्यांमधून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज जाहीर केला. कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यास प्राधान्य देऊन 'टेल टू हेड' पद्धतीने पाणीवाटप करावे. तसेच जानेवारीमध्ये पाण्याच्या उपलब्धतेचा फेरआढावा घेऊन अतिरिक्त आवर्तनाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात जलसंपदामंत्री डॉ. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जायकवाडी प्रकल्प, पैठणच्या सन २०२६-२७ या वर्षातील कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीस खासदार संदिपान भुमरे, आमदार सर्वश्री प्रकाश सोळंके, राजेश टोपे, प्रशांत बंब, रमेश बोरनारे, रत्नाकर गुट्टे, विठ्ठलराव लंघे पाटील, प्रतापसिंह पाटील, अंबादास दानवे, अमरसिंह पंडित, राहुल पाटील, नारायण कुचे, हिकमत उढाण, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जलसंपदा विभागाने प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता, सिंचन क्षेत्र आणि प्रस्तावित आवर्तनांचे सादरीकरण केले. आवर्तन म्हणजे कालव्यातून शेतीसाठी ठराविक कालावधीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याची पाळी होय. प्रारूप नियोजनानुसार पैठण डाव्या व उजव्या कालव्यासाठी रब्बी हंगामात प्रत्येकी तीन आणि उन्हाळी हंगामात प्रत्येकी एक, अशी चार आवर्तने प्रस्तावित होती. रब्बीसाठी १७.४८ टीएमसी व उन्हाळ्यासाठी ४.५९ टीएमसी असा एकूण २२.०७ टीएमसी संभाव्य पाणीवापर अपेक्षित आहे. रब्बी हंगामात सुमारे ५८ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ अपेक्षित असून, त्यात प्रामुख्याने चारा व भुसार पिकांचा समावेश आहे.
गोदावरीवरील सात बॅरेजेसमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन
गोदावरी नदीच्या खालच्या प्रवाहातील सात बॅरेजेसमध्ये पाणी उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या बॅरेजेसमध्ये पाणी सोडल्यास नदीकाठच्या गावांना लाभ होणार असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले. त्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या आवर्तनादरम्यान बॅरेजेसमधील पाणीसाठा वाढविण्याची शक्यता तपासून नियोजन करावे. उन्हाळ्यातील पाण्याची गरज आणि बाष्पीभवनामुळे होणारी घट विचारात घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. विखे पाटील यांनी दिले.शेतकऱ्यांच्या पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देताना पिण्याच्या पाण्याचे आरक्षण, भविष्यातील गरज आणि धरणातील उपलब्ध साठा यांचा समतोल राखावा. पाण्याचा अपव्यय टाळून प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचविण्यास प्राधान्य द्यावे, असेही जलसंपदामंत्र्यांनी सांगितले.