संकलन- सद्गुरू सेवक ॲड.डी.पी.पाटील, जालना
श्री.म.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पुतणे असलेले छन्नुभाई देसाई महाराजांनी समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराजांच्या नंतर गुंज संस्थानच्या कार्याची धुरा स्वीकारली. चिंतामणी महाराजांनी संस्थानच्या कार्यास जी गती दिली होती, तीचा वेग, व्याप्ती, भक्तगणांचा विश्वास, उपासनेची काटेकोरता हे सर्व सांभाळणे अवघड होते. परंतू, छनुभाईंनी आपल्या असीम निष्ठेने, कृपाप्रसादाने, शांत व संयमीपणे संस्थानच्या कार्यास प्रारंभ करून हे कार्य नेटाने चालविले. नऊ जुलै 1991 रोजी त्यांचा पट्टाभिषेक करण्यात आला. सद्गुरूंच्या उपासनेचा वारसा पुढे चालविण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला. चिंतामणी महाराजांनी त्यांना व त्यांच्या पत्नी मंजुळाबाई यांना श्रीक्षेत्र गुंज येथे अनुग्रह दिला. दत्त संस्थानातील उपासनेची आलेली परंपरा तशीच चालू ठेवली. याकडे छन्नुभाईंनी लक्ष दिले. हजारो भक्तांना अनुग्रह देवून नवीन पिढीमध्ये दत्तभक्ती वाढविली. दत्तमंदिरांच्या सभामंडपाचे नूतनीकरण करून त्यास संगमरवराने सुशोभित केले. भक्तांना निवासाची सुविधा व्हावी, म्हणून सर्व सोयींनीयुक्त असे भक्तनिवास बांधले.
योगानंद सरस्वती स्वामी महाराज व चिंतामणी महाराज यांच्या संगमरवरी मुर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याबरोबरच परभणी येथील वसमत रस्त्यावरील चिंतामणी महाराजांच्या मंदिरातही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून भव्य अशा मंदिराचे निर्माण त्यांनी केले. पुण्यतिथी उत्सवासाठी, श्राध्दविधी, समाराधना सर्व भक्तांना पाहता यावी, म्हणून प्रशस्त सभागृह गुंज येथे बांधले. जुन्या प्रसादालय व पाकशाळेचे नुतनीकरण करून एकाच वेळी हजार ते 1200 भक्त भोजन करू शकतील, असे भव्य प्रसादालय निर्माण केले. संस्थानचा कारभार संगणकीकृत केला. शेतीसाठी आधुनिक यंत्रणा उपलब्ध करून दिली. मंदिरासमोर नयन मनोहर असे उद्यान तयार केले. सध्या मंदिराच्या महाद्वाराचे व दर्शन इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
श्रीमत् जगत्पालक भगवान त्रिमूर्ती दत्तात्रेयाचे अंशावतार अशी ख्याती पावलेले श्रीमत् प.प.स.योगानंद सरस्वती (गांडा महाराज) महाराज हे गुजरात प्रांती सुरत जिल्ह्यातील तलंगपूर नावाच्या गावी जन्मले. लहानपणापासून शिवभक्तीचा जिव्हाळा अंतःकरणात असल्यामुळे पुढे प्रौढपणीही प्र्रपंचात वैराग्याचा पुरवठा भरपूर उमटत होता. लवकरच विरक्तपणे घरदार सोडून सद्गुरूच्या शोधार्थ फिरत असताना पूर्व पुण्याईने श्रीमत् प.प.स.वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) महाराज यांची भेट झाली. भेटी अंती जे घडले ते खालील उक्ती प्रमाणे.
तुका म्हणे गंगासागर संगमी ।
अवघ्या झाल्या उर्मी एकमय ।
पुढे काही दिवस श्रीगुरूच्या संगतीत राहून एकनिष्ठपणे सेवा केली. कालगती प्रमाणे श्रीमत् प.प.स.वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) महाराज श्री क्षेत्र गरूडेश्वर येथे समाधिस्थ होण्यापूर्वी श्री महाराजांनी संन्यास घेऊन मराठवाड्यात दक्षिणप्रांती जाण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे यती दीक्षा घेवून सात वर्षे मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात श्रीगंगेच्या उत्तर तीरावर पाथरी तालुक्याच्या दक्षिणेकडील टोकास गुंज या गावी सिध्दश्रेवर महादेवाच्या मंदिरात वास्तव्य केले. येथे असतांना कित्येक लोकांना अनुग्रह देऊन सद्गुरू सेवा व दत्त भक्तीस लावून त्यांचे कल्याण केले. पुढे शके 1850 च्या फाल्गुन वद्य 12 रोजी पार्थिव देहास विसर्जित करून शिवस्वरूपी विलीन झाले. त्यावेळेस श्रीसिध्देश्वर महादेवाचे मंदिर व त्या खालील दोन्ही बाजू कडील दोन लादण्याच उपलब्ध होत्या. त्यानंतर संस्थानच्या कारभाराची सूत्रे श्रीमत् प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पट्टशिष्य परम पूज्य श्री समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराज यांच्या हाती आली. त्यांनी संस्थानाची अत्यंत भरभराट करून सर्व बांधकाम अति दीर्घ प्रयत्नांनी व कसोटीने केले. जे आज भव्य स्वरूपात उभारलेले दिसत आहे ते सर्व काम म्हणजे परम पूज्य चिंतामणी महाराजांच्या दीर्घ प्रयत्नाने व पूज्य श्री छन्नुभाई महाराजास परम पूज्य चिंतामणी महाराजाकडून मिळालेल्या आशीर्वादाचे फळ आहे. मंदिरात मध्यभागी श्री दत्तात्रेयाची मूर्ती श्र्लोकात वर्णन केल्या प्रमाणे आहे.
मला कमंडलू रधःकरपंद्मउग्मे।
मध्यस्थ पाणी युगुले
डमरू त्रिशुले ।
यस्यस्थ ऊर्ध्व करयोः
शुभ शंख चक्रे ।
वंदे तम त्रिवरदं
भूजषट्क युक्तम्।
मूर्तीच्या उजव्या बाजूस श्रीमत् प.प.स.वासुदेवानंद सरस्वती महाराज यांचा मुखवटा आहे. श्रीदत्त मूर्तीचे दक्षिणेकडे श्रीमत् प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराज यांची तसबीर आहे. तसेच श्री दत्त मूर्तीचे समोर परमपूज्य चिंतामणी महाराज यांची तसबीर आहे. पुढे भव्य सभामंडप असून सभामंडपाचे उत्तरेकडील लाद्रीत श्री योगानंद महाराजाचे विश्रांती स्थान असून तेथे श्री योगानंद महाराजांची समाधी करून चरणमुद्रा व मुखवटा असून त्या पाठीमागे पूर्ण स्वरूपाची मूर्ती स्थापन केलेली आहे. सभामंडपाच्या दक्षिणेकडील भागात परमपूज्य सद्गुरू चिंतामणी महाराजांची स्पटीकाची भव्य मूर्ती स्थापन केलेली आहे. उत्तरेस उंचवट्यावर श्री सिध्देश्वर महादेवाचे मंदिर असून सभामंडपाच्या पुढच्या भागात कार्यालय व राहण्यासाठी खोल्या आहेत.
या सभामंडपाचा नुकताच जीर्णोध्दार झाल्याने व श्री गुरूचरित्र कथा चित्रमय स्वरूपात सभामंडपात लावल्याने त्यात भव्यता आणखीन वाढलेली दिसते. पुढे महाद्वार असून खाली दक्षिणेकडे भव्य स्वरूपात भक्तांना राहण्यासाठी आद्ययावत पध्दतीने भक्त निवास ही वास्तू परमपूज्य छन्नुभाई महाराजांच्या प्रेरणेने तयार झालेले असून मोठा प्रमाणात विस्तार पावत आहे. त्यापुढे गंगेचा काठावर घाट बांधलेला असून घाटालागत दक्षित वाहिनी गंगेचे विस्तीर्ण पात्र आहे. आच पात्रात प्रतिवर्षी मोठ्या उत्सवाचा वेळी यात्रा भरते.