जालना जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ, युवकांनी फिरविली पाठ

Jalna Nayak    20-Nov-2026
Total Views |
 
 
जालना : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना यांच्या वतीने आयोजित 'जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६' चा उद्घाटन सोहळा जिल्हा क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि भारतीय कला, संस्कृती व परंपरेचे जतन व संवर्धन करणे, हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे.युवा शाहीर रामानंद उगले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार हे होते. व्यासपीठावर डॉ. संदीप राठोड, श्री. राहुल कासोदे, जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव श्री. विजय गाडेकर, श्री. संग्राम तारडे, माजी नायब तहसीलदार श्री. सदाशिव पांडुरे यांच्यासह विविध स्पर्धांचे पंच व परीक्षक प्रमुख उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांनी स्पर्धक व उपस्थित युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. "युवा महोत्सव हे तरुणांच्या कलागुणांचा आविष्कार घडवणारे प्रभावी माध्यम आहे. अशा सांस्कृतिक व कलात्मक उपक्रमांमुळे युवकांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मोठी मदत होते," असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.महोत्सवांतर्गत समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, चित्रकला, पथनाट्य आणि कविता लेखन अशा विविध स्पर्धा रंगल्या. स्पर्धकांनी अत्यंत जोमाने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपली कला सादर केली. या सादरीकरणांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. परीक्षक व पंचांनी प्रत्येक सादरीकरणाचे बारकाईने परीक्षण करून गुणवत्तेनुसार योग्य मूल्यमापन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुन्नुलाल विठोरे यांनी केले, तर क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे यांनी सर्वांचे आभार मानले.महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम,लता लोंढे, आरती चिल्लारे, वरिष्ठ लिपिक संतोष प्रसाद व अमोल मुसळे, कनिष्ठ लिपिक. राहुल राठोड, तसेच राहुल गायके, हारूण खान, भानुदास लांडगे, विजय कांबळे, लताबाई लांडगे, सिंधू लांडगे व कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
युवकांनी फिरविली पाठ
जिल्हास्तरीय युवक महोत्सवाकडे तरूण तसेच तरूणींनी पाठ फिरविल्याचे चित्र यावेळी दिसून आले. महोत्सवाच्या प्रसिद्धी व नियोजनाबाबत क्रीडा कार्यालय कमी पडले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हास्तरीय म्हणल्यावर युवकांचा मोठा सहभाग आवश्यक होता. पण तसे चित्र दिसले नाही.