गुंज खुर्द येथे श्री योगानंद सरस्वती संस्थानचा दहावा पुण्यतिथी महोत्सव; २१ नोव्हेंबरला मुख्य धार्मिक कार्यक्रम

Jalna Nayak    20-Nov-2026
Total Views |
 
प.पू. श्री चन्नुभाई देसाई महाराज
 
 
प.पू. श्री चन्नुभाई देसाई महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; महापूजा, ग्रंथपारायण आणि पालखी सोहळ्याने महोत्सवाची सांगता
 
गुंज खुर्द (ता. पाथरी, जि. परभणी) : येथील श्री योगानंद सरस्वती संस्थानच्या वतीने प.पू. श्री चन्नुभाई देसाई महाराज यांचा दहावा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त रविवार, १५ नोव्हेंबर ते शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
प.पू. श्री चिंतामणी महाराज यांचे पट्टशिष्य प.पू. श्री चन्नुभाई देसाई महाराज यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. धार्मिक परंपरा, अध्यात्मिक साधना आणि गुरुभक्तीचा संगम असलेल्या या सोहळ्यामुळे गुंज खुर्द परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
महोत्सवाच्या कार्यक्रमांत श्री महा‍रुद्राभिषेक, श्री गुरुचरित्र, श्री गुरुमूर्ती चरित्र तसेच श्री गुरुपद्मलययोग ग्रंथाचे पारायण आदी धार्मिक उपक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना धार्मिक श्रवण, चिंतन आणि गुरुस्मरणाची संधी उपलब्ध होणार आहे.
शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचा मुख्य पुण्यतिथी कार्यक्रम होणार आहे. कार्तिक शुद्ध द्वादशी, शके १९४८ या दिवशी श्रींचा श्रद्धादिन, महारुद्राभिषेक आणि ग्रंथपारायणाची सांगता होणार आहे. याच दिवशी रात्री १० वाजता मंदिर प्रदक्षिणा मार्गाने श्रींचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहून श्रींचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, तसेच सर्व कार्यक्रमांना भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन श्री योगानंद सरस्वती संस्थान आणि वंशपरंपरागत विश्वस्त श्री राजेशभाई चन्नुभाई देसाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.