जालना: १ कोटी ७५ लाखांची फसवणूक प्रकरण: पंकज राठोडला मुळशीतून अटक; चार दिवसांची पोलीस कोठडी

Jalna Nayak    21-Nov-2026
Total Views |

पंकज राठोडला मुळशीतून अटक
 
जालना: प्लॉटिंग आणि जमीन व्यवहारातील गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल १ कोटी ७५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणातील फरार आरोपी पंकज नामदेव राठोड याला आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) पथकाने पुणे जिल्ह्यातील मुळशी येथून जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
२०२१ मध्ये मुख्य सूत्रधार सचिन नामदेव राठोड आणि त्याच्या साथीदारांनी प्लॉटिंग व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा १० टक्के निश्चित परतावा देण्याचे आमिष फिर्यादी आशीष अविनाश चव्हाण यांना दाखवले होते. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी बनावट ७/१२ उतारे, अकृषक (NA) परवाने आणि इतर कागदपत्रे तयार करून नोटरी करारनामा व धनादेश दिले. या व्यवहारात फिर्यादीकडून सुरुवातीला १ कोटी ५० लाख रुपये घेण्यात आले; मात्र कोणताही परतावा मिळाला नाही आणि दिलेले धनादेशही वटले नाहीत. याप्रकरणी २०२२ मध्ये बिडकीन पोलीस ठाण्यात फसवणूक आणि एमपीआयडी (MPID) कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन सचिन राठोडला अटक करण्यात आली होती.
 
कारागृहातून सुटल्यानंतरही फसवणूक सुरूच
तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही आरोपींनी बोकुड जळगाव (ता. पैठण) येथील जमीन नावावर करून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार फेब्रुवारी २०२४ मध्ये पुन्हा २० लाख रुपये (१० लाख रुपये धनादेशाद्वारे आणि १० लाख रुपये रोख) उकळण्यात आले. अशा प्रकारे आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आशीष चव्हाण यांची एकूण १ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक केली.
 
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०७/२०२६ नुसार, भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ५०६, ३४ तसेच अनियमित ठेव योजनांवर प्रतिबंध घालणारा अधिनियम, २०१९ (Bharatiya Nyaya Sanhita / IPC व BUDS Act) मधील कलम ३, ४, २१(१)(२) आणि २२ अन्वये २८ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा नोंद झाल्यापासून आरोपी आपले मोबाईल फोन बंद ठेवून आणि अस्तित्व लपवून फरार होते.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० नोव्हेंबर २०२६ रोजी आरोपी पंकज नामदेव राठोड याला पुणे जिल्ह्यातील मुळशी येथून अटक केली. आज (२१ नोव्हेंबर) त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
 
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के तसेच पोलीस अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, रवींद्र जाधव, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, श्रेयस वाघमारे, चालक गोविंद दराडे, मंगेश पोपळघट, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे आणि महिला पोलीस अंमलदार जया निकम यांनी पार पाडली.