जेवढे चॅलेंज फेस कराल, तेवढेमजबूत व्हाल-यजुर्वेंद्र महाजन

Jalna Nayak    22-Nov-2026
Total Views |
 
जालना एज्युकेशन फाउंडेशन
 
जिल्ह्यातील 265 गरजू विद्यार्थ्यांना 35 लाखांची 'कलश शिष्यवृत्ती' प्रदान
जालना : आयुष्यात संकटे आणि आव्हाने येतच असतात. परंतु, जेवढे चॅलेंज तुम्ही फेस कराल, तेवढेच अधिक मजबूत बनाल. केवळ गुणवंत असून चालत नाही, तर जे हिंमत दाखवतात तेच पुढे जातात. आपण जे शिकतो, ऐकतो त्यावर प्रत्येकाला स्वतःचे मत मांडता व व्यक्त होता आले पाहिजे. चुकत असले तरी बोला, कारण चुकीचे बोलण्याचीही हिम्मत केली नाही तर माणूस आयुष्यात कधीच सुधारू शकत नाही, असा मौलिक व प्रेरणादायी सल्ला जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांना दिला.
 
रविवार दि. 22 नोव्हेंबर रोजी अग्रसेन फाउंडेशन येथे जालना एज्युकेशन फाउंडेशन संचलित कलश सीड्स शिष्यवृत्ती प्रदान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी आर्थिक दुर्बल घटकातील 265 विद्यार्थ्यांना 35 लाख 5 हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली, त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून यजुर्वेंद्र महाजन बोलत होते. अध्यक्षस्थानी कलश सीड्सचे चेअरमन सुरेश अग्रवाल हे होते तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हाधिकारी अशीमा मित्तल, ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवी भाईश्री रमेशभाई पटेल, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अशोक बनकर हे उपस्थित होते. व्यासपीठावर सौ. रेखादेवी अग्रवाल, कलर सीड्सचे व्यवस्थापकीय संचालक समीर अग्रवाल, संचालिका वर्षा अग्रवाल, जतन अग्रवाल, इशिता अग्रवाल-मालपाणी, जालना एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील रायठठ्ठा, उपाध्यक्ष प्रा. सुरेश लाहोटी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
शैक्षणिक मार्ग सुकर करणारा स्तुत्य उपक्रम-रमेशभाई पटेल : समाजसेवी रमेशभाई पटेल यांनी विद्यार्थ्यांना हिमतीचा संदेश दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आणि मदतीची नितांत गरज आहे, अशा वेळी सुरू असलेला जालना एज्युकेशन फाउंडेशन संचलित कलश शिष्यवृत्तीचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. पुढे जाण्यासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी अपार हिंमत असावी लागते. विद्यार्थ्यांनी केवळ स्वप्ने न बघता ती पूर्ण करण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली पाहिजे. मनात जिद्द ठेवून प्रामाणिकपणे काम केले तर अडचणी दूर होतात आणि जग तुमच्या पाठीशी उभे राहते, असा सल्ला त्यांनी दिला.
 
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा प्रयत्न-वर्षा अग्रवाल:
कलश सीड्सच्या संचालिका वर्षा अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना सांगितले, ज्याप्रमाणे चांगल्या बियाण्याला योग्य माती, वातावरण आणि खत-पाण्याची गरज असते, तेव्हाच ते उत्तम प्रकारे बहरते; त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य वेळी थोडे सहकार्य आणि संधी मिळाली तर ते उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. यंदा जालना जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील १७९ गावांमधून २६५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून यात १३३ मुली आणि १३२ मुले आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च पेलणे कुटुंबांसाठी कठीण असते, अशा वेळी ही शिष्यवृत्ती त्यांच्या पाठीशी उभी राहत आहे. विद्यार्थ्यांनी आलेल्या अडचणींवर मात करून जिद्दीने शिक्षण पूर्ण करावे आणि उद्या स्वतःच्या पायावर उभे राहून समाजातील इतर गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्यावा.
 
सहा वर्षात 1कोटी 78 लाखाची शिष्यवृत्ती प्रदान-प्रा. सुरेश लाहोटी
जालना एज्युकेशन फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रा. सुरेश लाहोटी यांनी प्रास्ताविकात शिष्यवृत्ती उपक्रमाची माहिती दिली. शेतकरी कुटुंबातील आणि आर्थिक अडचणीत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये, यासाठी सहा वर्षांपूर्वी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षापासून कलश सीड्सने शिष्यवृत्तीचे संपूर्ण दायित्व स्वीकारले आहे. पहिल्यावर्षी १२२ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता २६५ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. आजवर १ हजार ४२३ विद्यार्थ्यांना १ कोटी ७४ लाख रुपयांहून अधिक रकमेची शिष्यवृत्ती पारदर्शक प्रक्रियेद्वारे वितरित करण्यात आली आहे. शिक्षणाचा खर्च वाढत असताना कलश सीड्सने दाखवलेला विश्वास आणि दिलेले सहकार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगून त्यांनी राबविण्यात येत असलेल्या इतर विविध उपक्रमांची माहिती दिली.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील सारडा यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जालना एज्युकेशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक प्रा. राहुल लाहोटी यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षणप्रेमी, उद्योजक, शिक्षक, विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, जालना एज्युकेशन फाउंडेशनचे विश्वस्त, विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
स्वप्ने पहा व ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने उतरा-अशीमा मित्तल : जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आयुष्यात ध्येय आणि स्वप्ने मोठी असावीत. जोपर्यंत आपले लक्ष्य स्पष्ट नसते, तोपर्यंत मार्ग सापडत नाही. मनात जिद्द ठेवून आपण प्रामाणिक प्रयत्न सुरू केले की, कलर सीड्स आणि त्यांना एज्युकेशन फाउंडेशनप्रमाणे सहकार्य आणि मार्ग आपोआप मिळत जातात. जीवनात काय कमी आहे यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपल्याकडे काय क्षमता व कौशल्य आहे, यावर विश्वास ठेवून मेहनत करा. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसून कठोर परिश्रमाला पर्याय नाही, असे सांगून कलश सीड्स व जालना एज्युकेशन फाउंडेशनच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
शिष्यवृत्ती उपक्रमाचा आणखी विस्तार व्हावा-सुरेशबाबू अग्रवाल : कलश सीड्सचे चेअरमन सुरेशबाबू अग्रवाल यांनी अध्यक्षीय समारोप करताना उपक्रमाचा गौरव केला. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती हा असा उपक्रम आहे, ज्यामुळे त्यांच्या स्वप्नांना बळ मिळते. जालना एज्युकेशन फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली वर्षा अग्रवाल, समीर अग्रवाल यांच्या पुढाकारातून चालवल्या जात असलेल्या या उपक्रमाचा आणखी विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून हे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी जालना एज्युकेशन फाउंडेशन व संयोजकांना समाजानेही पुढे येऊन मोठी मदत करावी, जेणेकरून जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.