ग्रामीण जीवन म्हणजे केवळ हिरवीगार शेते आणि मातीचा सुगंध नसतो; तर गावगाड्याच्या पोटात जातिव्यवस्था, आर्थिक विषमता, स्त्रीजीवनाची घुसमट आणि शेतकऱ्यांच्या जगण्यातील अनिश्चितता असे अनेक अदृश्य पैलू दडलेले असतात. डॉ. सत्यशीला उत्तमराव तौर-देशमुख यांनी ‘कवडसा’ (पालवी प्रकाशन) या कथासंग्रहातून अशाच अस्वस्थ करणाऱ्या सामाजिक वास्तवाचा संवेदनशील वेध घेतला आहे. या संग्रहात ‘निरप्या’, ‘दिसं’, ‘गोषा’, ‘मया’, ‘दवंडी’, ‘सोयरीक’, ‘वलांडा’ आणि ‘कवडसा’ या आठ कथांचा समावेश आहे. लेखिकेच्या अनुभवविश्वाला सामाजिक जाणिवांची जोड लाभल्यामुळे या कथांतील पात्रे काल्पनिक न वाटता आपल्या भोवताली वावरणारी जिवंत माणसे वाटतात.
‘निरप्या’ या कथेत बबन या बालकाच्या अनुभवातून बालमजुरी, जातीय विषमता आणि शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांचे विदारक वास्तव मांडले आहे. पाटलांच्या मुलाच्या शैक्षणिक संधी आणि बबनचे श्रमाधारित बालपण यातील विरोधाभास वाचकाला अंतर्मुख करतो. ‘दिसं’ ही कथा मृत्यू, कर्ज आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्यांचा वेध घेते; जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर उभी राहणारी आर्थिक विवंचना आणि जगण्यातील अगतिकता शब्दांचा बडेजाव न करता प्रसंगांच्या माध्यमातून प्रभावीपणे व्यक्त होते.
‘गोषा’ ही कथा स्त्रीजीवनातील आत्मसन्मान, सामाजिक प्रतिष्ठा आणि स्त्रीमैत्रीची भावनिक ताकद अधोरेखित करते. हौसा आणि मंजुळा यांच्या जत्रेला जाण्याच्या प्रसंगातून स्त्रीच्या इच्छेला सामाजिक मान्यतेची गरज का भासते, हा प्रश्न उपस्थित होतो. ‘मया’ या कथेत गंगा आणि सुमन यांच्या नात्यातून स्त्रीमनातील माया, मत्सर, कर्तव्य आणि असहायता अशा परस्परविरोधी भावनांचे पदर उलगडतात. ‘दवंडी’मधून स्त्रीशिक्षणाचा प्रश्न ठळकपणे समोर येतो. बायजाबाई आणि रुक्मिणीसारख्या पात्रांद्वारे शिक्षण हे केवळ अक्षरज्ञान नसून स्वतःच्या अस्तित्वाची व हक्कांची जाणीव करून देणारे साधन असल्याचे लेखिका अधोरेखित करतात.
‘सोयरीक’ ही कथा पाटील आणि देशमुख कुटुंबातील विवाहचर्चेतून विवाहसंस्थेतील मानपान, आर्थिक निकष आणि बदलती मूल्यव्यवस्था दाखवते; प्रतिष्ठेपेक्षा माणुसकी व मुलीच्या शिक्षणाला महत्त्व देण्याची भूमिका यात दिसते. ‘वलांडा’ या कथेतील धुरपता ही केवळ अंधश्रद्धेची बळी नसून माणसांवर विश्वास ठेवण्याची शिक्षा भोगणारी स्त्री आहे; स्त्रीच्या दुःखाला नशिबाचे कारण देण्यापेक्षा त्यामागील संशयी समाजव्यवस्था तपासण्याची दृष्टी ही कथा देते. शीर्षककथा ‘कवडसा’मधील माधू आणि गौरीचे जगणे शेतीच्या अनिश्चिततेचे प्रतिनिधित्व करते. स्वतःच्या जगण्याची खात्री नसताना पत्नीला नव्याने संसार करण्याचे आश्वासन देणारे माधूचे शब्द शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाला आकडेवारीपलीकडे जाऊन मानवी चेहरा देतात.
प्रमाण मराठीबरोबरच ग्रामीण बोलीभाषेचा (‘म्या’, ‘काई’, ‘न्हाय’, ‘कवळ’) सहज वापर, म्हणी आणि वाक्प्रचार या कथांना जिवंतपणा देतात. मात्र, साहित्यकृतीचे समतोल मूल्यमापन करताना काही मर्यादाही जाणवतात. काही कथांमध्ये निवेदनाचा अनावश्यक विस्तार झाल्याने कथनाचा वेग मंदावतो, तर तीव्र भावनिकतेमुळे सूचकतेला वाव कमी मिळतो. शिवाय जातीय विषमता, स्त्रीशिक्षण किंवा शेतकरी संकटांची व्यापक सामाजिक-आर्थिक कारणे अधिक सखोलपणे मांडली असती आणि काही समस्यांवरील उपाय तुलनेने आदर्शवादी न दाखवता वास्तवातील गुंतागुंत अधिक ठळक केली असती, तर कथांना आणखी वैचारिक खोली लाभली असती.
या मर्यादा असूनही ‘कवडसा’चे मोल कमी होत नाही, कारण या संग्रहाच्या केंद्रस्थानी माणूस आहे. लेखिका पात्रांच्या दोषापेक्षा त्यांना त्या अवस्थेपर्यंत आणणाऱ्या परिस्थितीचा शोध घेतात. विकासाच्या घोषणा होत असताना आजही बबनसारख्या मुलांच्या हातात श्रम येतात, बायजाबाईंना शिक्षणासाठी झगडावे लागते आणि माधूसारख्या शेतकऱ्यांना उद्याची खात्री नसते. अशा काळोखात ‘कवडसा’ संपूर्ण अंधार दूर करणार नसला, तरी अंधारात हरवलेल्या माणसांचे संवेदनशील चेहरे वाचकांना नक्कीच दाखवतो.
पुस्तक परिचय
पुस्तक: कवडसा
लेखिका: डॉ. सत्यशीला उत्तमराव तौर-देशमुख
प्रकाशन: पालवी प्रकाशन, ठाणे (प्रथमावृत्ती : १२ डिसेंबर २०२५)
पृष्ठसंख्या: ९६ | किंमत: ₹१८०
समीक्षक:डॉ. वासुदेव उगले
विभागप्रमुख, मराठी भाषा व वाङ्मय विभाग,
श्रीमती दानकुँवर महिला महाविद्यालय, जालना
ई-मेल: vasnt.ugale@gmail.com