_202611242004211668.png)
तुळशी विवाह पार पडले की लगीनसराई सुरु होते. आजूबाजूला लग्नाच्या गाण्यांचे आणि वरातींचे आवाज कानी पडू लागतात. हिंदू धर्मात १६ संस्कारांपैकी पाणिग्रहण म्हणजेच विवाह संस्काराला अनन्यसाधारण महत्व आहे. ब्रह्मचर्याश्रमांतून गृहस्थाश्रमाला सुरुवात करण्यापूर्वी जो संस्कार केला जायचा त्यालाच पूर्वी विवाह संस्कार म्हटले जात असे. गृहस्थाश्रमाला सुरुवात करण्यातील आरंभीचा टप्पा म्हणून विवाह संस्काराचे महत्व आजही अबाधित आहे. देव, अग्नी आणि ब्राह्मण यांच्या साक्षीने हा विवाह संस्कार पार पडतो. विवाह संस्कारामध्ये श्री गणेश पूजन, सीमांतपूजन, मधुपर्कपूजन, गौरीहरपूजन, कन्यादान, मंगळसूत्र बंधन, अक्षतारोपण, मंगलाष्टके, विवाह होम, पाणिग्रहण, लाजाहोम, सप्तपदी, गर्भाधान असे अनेक विधी असतात. या प्रत्येक विधीच्या वेळी म्हटले जाणारे मंत्र आणि केलया जाणाऱ्या कृती यामागे ऋषीमुनींचा संकल्प कार्यरत असतो, त्यामुळे या विधी योग्यरीत्या होणे अत्यंत महत्वाचे असते. विवाह संस्कार म्हणजे उभयतांना केवळ सहचर्य करण्याची अनुमती देणारा संस्कार नसून भावी जीवनात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची सांगड घालण्याची शिकवण देणारा संस्कार आहे. आताचे विवाह पाहता विवाहातील धार्मिक विधींपेक्षा कृत्रिम अवडंबरालाच अधिक महत्व दिले जात असल्याचे सर्वत्र दिसून येते. विवाहासारख्या धार्मिक कार्यक्रमाचाही हल्ली इव्हेन्ट होऊ लागला आहे, त्यामुळे त्यातील सात्विकताच लोप पावू लागली आहे.
विवाह जुळवण्यासाठी हुंडा देणे आणि घेणे दोन्हीही भारतीय दंडविधानानुसार गंभीर गुन्हे आहेत. तरीही देशातील अनेक भागांत आजही हुंडा दिला आणि घेतला जात आहे. या हुंड्याच्या लोभामुळे दरवर्षी कितीतरी नववधूंचा छळ केला जातो. त्यापैकी कितीतरी जणी या छळाला कंटाळून आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारतात. व्हाट्स अप आणि टेलिग्रामच्या दुनियेतेत आजही महागड्या लग्नपत्रिका छापल्या जातात. विवाहाचे बॅनर्स आणि होर्डिंग्स लावण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून रूढ होत चालली असून यावरही अवास्तव खर्च केला जातो. निश्चित केलेल्या मुहूर्तावर विवाह लागणे, अत्यंत महत्वाचे असते. पुरोहितांकडून मुहूर्ताच्या वेळी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी देवतांना उपस्थित राहण्यास आवाहन केले जात असल्याने मुहूर्ताला देवता सूक्ष्मरूपाने उपस्थित राहतात असा शास्त्रसंकेत आहे, त्यामुळे पूर्वी मुहूर्तावर विवाह लागण्यासाठी आधीपासूनच सर्व सिद्धता केली जात असे. आजमितीला विवाहाच्या मुहूर्तापेक्षा जवळच्या नातेवाईकांची उपस्थिती आणि वधू-वरांचा मेक अप यांना अधिक महत्व दिले जाते. त्यासाठी विवाह रोखून धरला जातो. अनेक जण विवाहविधी पार पसल्यानंतर स्वागत समारंभाची आणि भोजनाची वेळ पाळून विवाहाला उपस्थित राहतात. पूर्वी लग्नाची मंगलाष्टके म्हणण्यात चढाओढ लागत असे. एक मंगलाष्टक संपले कि दुसरे मंगलाष्टक म्हणण्याची संधी साधण्यासाठी उपस्थितांकडून आटापिटा केला जात असे. हल्ली बहुतांश ठिकाणी केवळ मंगलाष्टके म्हणण्यासाठी वाद्यवृंद आणि गायक बोलावले जातात. वधूवरांनी एकमेकांना पुष्पहार घालून झाल्यावर त्यांच्या मस्तकावर अक्षता वाहण्याची पद्धत आहे; मात्र अनेकांना याविषयी पुरेशी माहिती नसल्याने मंगलाष्टके चालू असतानाच अक्षता उधळल्या जातात. परिणामी अक्षता वधू वरांच्या मस्तकावर न पडता कार्यक्रमस्थळी सर्वत्र विखुरल्या जातात. वधू-वरांनी एकमेकांना पुष्पहार घालणे हा विवाहातील एक महत्वाचा क्षण असतो. त्यालाही मनोरंजक करण्यासाठी हल्ली वधू-वरांना उगाचच उंचावर उचलून सहजपणे हार न घालू न देण्यासाठी नातेवाईकांकडून जीवाचा आटापिटा केला जातो. ज्यामुळे त्यातील धार्मिकता निघून जाऊन तो केवळ मनोरंजनाचा खेळ बनतो. स्वागत समारंभासाठी परिधान करण्यात येणारे हिंदू वधु-वरांचे कपडेही हल्ली पाश्चात्य पद्धतीने शिवण्याची प्रथा पडू लागली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी विवाह ख्रिश्चनांचा आहे कि हिंदूंचा हा उपस्थितांनाही प्रश्न पडतो. विवाह विधी पार पडल्यानंतर सर्वांना एकत्र गोळा करून त्यांच्या समक्ष वधु-वरांकडून महागडा केक कापला जातो. हिंदू धर्मात शिजलेल्या अन्नपदार्थांवर सूरी फिरवणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे विवाहासारख्या सात्विक कार्यक्रमामध्ये अशी असात्त्विक कृती करणे अयोग्यच म्हणावे लागेल. हल्ली लग्नाच्या सिद्धतेसाठी नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना वेळ द्यायला नको म्हणून इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीला लाखो रुपये देऊन कंत्राट दिले जाते. ही कंपनी विवाहातील धार्मिक विधींना अधिक महत्व न देता सोहळा अधिकाधिक मनोरंजक आणि आकर्षक कसा होईल याकडे अधिक लक्ष देतात. त्यामुळे अनेक ठिकाणी धार्मिक विधी चालू असताना दुसरीकडे सिनेसंगीत चालू असते. त्यामुळे उपस्थितांचे लक्ष त्याकडेच अधिक जाते. विवाह विधी सुरु असताना जी शांतता अपेक्षित असते ती न पाळता सर्वत्र गोंगाटाचे वातावरण असते. आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी याच कंपन्यांकडून वधु-वरांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे सिनेगीतांवर नृत्य बसवले जातात, विवाह विधीनंतर त्याचे विशेष सादरीकरण असते. स्टेजवर लोकांसमोर नाचायचे आहे, तर सर्व व्यवस्थितच व्हायला हवे यासाठी जवळचे नातेवाईक लग्नाच्या तयारीत हातभार लावण्यापेक्षा या नृत्याच्या तयारीतच अधिक व्यस्त असतात. विवाह विधी हा वर आणि वधु या दोहोंच्या नातेवाईकांसाठी आनंदाचा विधी असतो, त्यामुळे विवाहाप्रित्यर्थ उपस्थितांना प्रीती भोजन दिले जाते. हे भोजन वधु वरांच्या कुटुंबाच्या ऐपतीनुसार दिले जायला हवे; मात्र इथेही आत्त्मप्रौढीसाठी भोजनात नको तितक्या पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. काही ठिकाणी भोजनासाठी शाकाहार आणि मांसाहार असे वेगवेगळे कक्ष उभारले जातात. याशिवाय चायनीज, इटालियन पदार्थांचे कक्ष उभारण्याचीही पद्धत हल्ली रूढ होत चालली आहे. शहरी भागांत भोजनासाठी सर्रास 'बुफे' पद्धत अवलंबली जाते. लग्नाला उपस्थित मंडळी आपल्या भुकेचा अंदाज न घेता नको तितके पदार्थ ताटात वाढून घेतात आणि संपवता न आल्याने त्यातील काही पदार्थ ताटात अर्धवट सोडून देतात. दरवर्षी लगीन सराईमध्ये असे कितीतरी टन अन्न केवळ ताटात अर्धवट सोडून दिल्यामुळे वाया जाते. दुष्काळाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्राला अशाप्रकारे अन्न वाया घालवणे नक्कीच परवडणारे नाही. अन्न वाया घालवणे हा अन्नदेवतेचा आणि ते पिकवणाऱ्या शेतकऱ्याचाही अवमान आहे. विवाहानंतर मंजुळ आवाजाच्या पारंपरिक वाद्यांनीशी वधु -वरांची वरात काढण्याची प्रथा लोप पावत चालली आहे. हल्ली वरातीसाठी डीजे, बेण्डबाजा आणि कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीसाठी लाखो रुपये उधळले जातात. याशिवाय मित्र मंडळींना मद्याच्या आणि मांसाहाराच्या मेजवान्या झाडण्यासाठी खर्च होतो तो वेगळाच. विवाह सोहळा म्हणजे खरेतर वधु-वरांचा उत्सव, मात्र त्यातही हल्ली नातेवाईकांचे मानापमान नाट्य पाहायला मिळते. मनासारखे कपडे किंवा दागिने घेतले नाहीत, पत्रिकेत नाव टाकले नाही किंवा शेवटी नाव टाकले म्हणून ऐन लग्नातही नातेवाईकांचे रुसवे फुगवे सुरु असतात.
लग्न सोहळ्यासाठी खरेतर आपल्या ऐपतीप्रमाणेच खर्च केला जावा; मात्र 'लोकांना काय वाटेल' या विचाराने वर-वधूच्या कुटुंबियांकडून लग्न सोहळा दिमाखात पार पडावा यासाठी कर्ज काढून नको त्या गोष्टींवर खर्च केला जातो. त्यामुळे विवाह संस्कारातील धार्मिक विधी राहतात बाजूला आणि अनावश्यक बाबींसाठी पाण्यासारखा पैसा व्यय होतो. लग्नानंतर नवा संसार उभा करण्यासाठी जागोजागी धनाची निकड भासते; मात्र वधु-वरांची सुरुवातीची काही वर्षे लग्नासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यातच व्यय होतात. विवाह संस्कारामध्ये केवळ धार्मिक विधींना महत्व उपरोक्त बाबींचा मुलामा निव्वळ दिखाव्यासाठी असतो. पूर्वी अनोळखी व्यक्तींसोबत विधिवत विवाह संस्कार करून केलेले विवाहही पुढे आयुष्यभर टिकून राहात असत, त्यामुळे घटस्फोट नावाचा प्रकार पूर्वीच्या काळी अस्तित्वातही नव्हता. हल्ली घटस्फोटांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यामागे वेगवेगळी कारणे असली तरी विवाह संस्कारांना दिले जाणारे दुय्यम महत्व याचाही इथे उल्लेख करावासा वाटतो. लोकांना, नातेवाईकांना काय वाटेल या विचाराने आपण कर्जबाजारी होऊन लग्न सोहळे साजरे करत असू तर हेच लोक नंतरही आपल्याला नावे ठेवणारच आहेत. विवाह संस्कारांत शिरलेल्या अनिष्ट प्रथांचे समूळ उच्चाटन झाले कि त्यासाठी केला जाणारा अवास्तव खर्चही वाचेल. यासाठी सर्वानीच पुढाकार घेऊन विवाह संस्कारात देखाव्यापेक्षा परंपरागत धार्मिक विधींना प्राधान्य द्यायला हवे !