२६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत मोलाचा आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाही मार्गाने राज्यकारभार चालविण्यासाठी स्वतंत्र भारताची राज्यघटना घडविण्याची ऐतिहासिक जबाबदारी भारतीयांवर आली. मार्च १९४६ मधील 'कॅबिनेट मिशन'च्या योजनेनुसार जुलै १९४६ मध्ये संविधान सभेच्या निवडणुका झाल्या. सुरुवातीची ३८९ सदस्यसंख्या फाळणीनंतर २९९ इतकी झाली. ९ डिसेंबर १९४६ रोजी पहिल्या अधिवेशनात डॉ. सच्चिदानंद सिन्हा हंगामी अध्यक्ष होते, तर ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्षपदी निवड झाली.
संविधान निर्मितीचे सर्वात मोठे काम २९ ऑगस्ट १९४७ रोजी स्थापन झालेल्या सात सदस्यांच्या 'मसुदा समिती'कडे आले. अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती झाली. घटनात्मक सल्लागार बी. एन. राव यांचे प्रारूप, विविध समित्यांचे अहवाल आणि सभागृहातील सखोल चर्चा यांचा समन्वय साधत डॉ. आंबेडकरांनी अत्यंत विद्वत्तेने संविधानाचा मसुदा आकाराला आणला. या असामान्य योगदानामुळेच त्यांना 'भारतीय संविधानाचे शिल्पकार' म्हणून गौरविले जाते. तब्बल २ वर्षे, ११ महिने आणि १७ दिवसांच्या अथक परिश्रमातून संविधानाची निर्मिती झाली.
अखेर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केले. काही तरतुदी त्याच दिवशी लागू झाल्या; मात्र १९३० च्या 'पूर्ण स्वराज्य' संकल्पाच्या स्मरणार्थ २६ जानेवारी १९५० पासून संपूर्ण संविधान लागू होऊन भारत सार्वभौम प्रजासत्ताक बनला. मूळ संविधानात ३९५ अनुच्छेद, २२ भाग आणि ८ अनुसूच्या होत्या; आज विविध दुरुस्त्यांनंतर १२ अनुसूच्या आहेत.
संविधानाची 'प्रास्ताविका' हा तिचा आत्मा आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तिची मुख्य मूल्ये आहेत. १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीने प्रास्ताविकेत 'समाजवादी', 'धर्मनिरपेक्ष' आणि 'एकात्मता' हे शब्द समाविष्ट करण्यात आले.
देशभरात २०१५ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त २६ नोव्हेंबर हा 'संविधान दिन' म्हणून अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मात्र, यापूर्वीच महाराष्ट्रात २००५ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी शाळांमध्ये प्रास्ताविका वाचनाचा उपक्रम सुरू केला होता. त्यांच्या व 'संविधान फाऊंडेशन'च्या प्रयत्नांतून महाराष्ट्र शासनाने २४ नोव्हेंबर २००८ रोजी परिपत्रक काढून राज्यात संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली आणि २०१३ पासून सर्व शाळांमध्ये परिपाठात प्रास्ताविका वाचन अनिवार्य केले.
डॉ. आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९४९ च्या भाषणात केवळ राजकीय लोकशाही नव्हे, तर सामाजिक व आर्थिक लोकशाही रुजविण्याचा आग्रह धरला होता. मूलभूत अधिकार व कर्तव्यांची जाणीव ठेवून संविधानातील मूल्यांचे जतन करणे, हीच खरी लोकशाही बळकट करण्याची गुरुकिल्ली आहे.