एमआयडीसी क्षेत्र, नगर पंचायत आणि 'नमो गार्डन'ची केली पाहणी
जालना : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज घनसावंगी तालुक्याचा दौरा करून घनसावंगी परिसरातील ऊसतोड कामगारांच्या ऊस तोडणी शेतात जाऊन त्यांची भेट घेत संवाद साधला. यावेळी त्यांनी कामगारांचे राहणीमान, पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सुविधा आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली. ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तालुक्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी घनसावंगी येथील प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली. जागेची उपलब्धता, रस्ते, वीज आणि पाण्यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधांच्या उभारणीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. औद्योगिक प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यानंतर जिल्हाधिकारी मित्तल यांनी घनसावंगी नगर पंचायत कार्यालयास भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा व्यवस्थापन, कर संकलन आणि प्रलंबित विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला. नागरिकांना दैनंदिन सेवा सुलभ आणि पारदर्शकपणे मिळाव्यात, यासाठी दप्तर दिरंगाई टाळून कामे वेळेत पूर्ण करण्याची तंबी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. दौऱ्याच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी घनसावंगी येथील 'नमो गार्डन'ला भेट देऊन तेथील सुशोभीकरण आणि उपलब्ध सोयी-सुविधांची पाहणी केली. उद्यानातील स्वच्छता, वृक्षारोपण, लहान मुलांची खेळणी आणि नागरिकांसाठी असलेल्या सुविधांची देखभाल नियमितपणे राखली जावी, जेणेकरून नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक उत्तम ठिकाण उपलब्ध राहील, असे त्या म्हणाल्या. या दौऱ्याप्रसंगी, घनसावंगीचे तहसीलदार, नगर पंचायत मुख्याधिकारी, पोलिस निरीक्षक तसेच संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.