समृद्धी महामार्गावर आरोपीला अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी
जालना / प्रतिनिधी
टोमॅटो खरेदीच्या नावाखाली बदनापूर परिसरातील ४० शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करून पसार झालेल्या व्यापारी टोळीच्या मुख्य सूत्रधाराला आर्थिक गुन्हे शाखेने समृद्धी महामार्गावर अटक केली. सागर चिमण काकड असे आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार फाटा येथील जगदंबे ड्रायव्हर ढाब्याच्या शेडमध्ये आरोपींनी 'राधे-राधे ट्रेडिंग कंपनी'च्या नावाने दुकान सुरू केले होते. या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून १७ ते २८ सप्टेंबरदरम्यान ४० शेतकऱ्यांकडून १५ रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो खरेदी केले. या व्यवहाराची एकूण रक्कम १५ लाख ४२ हजार ८८५ रुपये होती.
माल खरेदी केल्यानंतर बँक बंद असल्याचे किंवा खात्याशी संबंधित अडचणी असल्याचे कारण सांगत व्यापाऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. उद्या-परवा सर्व पैसे एकत्र देतो, असे आश्वासन देत शेतकऱ्यांचा टोमॅटो विविध वाहनांतून नेला. मात्र, २८ सप्टेंबर रोजी दुकान बंद करून आरोपी पसार झाले. त्यानंतर त्यांचे मोबाईलही बंद झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी प्रल्हाद बाबुराव टकले यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. पोलिसांनी मुख्य आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक तेथे गेले; मात्र तो हाती लागला नाही. पुढील तपासात तो समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने जात असल्याचे समजले. त्यानुसार पाठलाग करून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार, २६ नोव्हेंबरच्या रात्री जालना परिसरात त्याला अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के व आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
इतर ठिकाणीही केली फसवणूक
पकडण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध अन्य पोलीस ठाण्यांमध्येही अशाच प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून, शेतकऱ्यांची फसवणूक करून मिळविलेल्या रकमेचा तपासही केला जात आहे. त्यामुळे पोलीस कोठडीत आरोपीकडून आणखी कुठे कुठे शेतकऱ्यांना फसवले, हे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.