बालविवाह रोखण्यासाठी जालना जिल्ह्याचा पुढाकार

Jalna Nayak    27-Nov-2026
Total Views |

बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती
मुलींच्या शिक्षणासाठी सर्वस्तरांतून सहकार्याचा निर्धार
शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि सामाजिक संस्थांचा एकत्रित प्रयत्न;
बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती व प्रभावी उपाययोजनांवर भर
जालना: बालविवाहाला प्रतिबंध घालून मुलींचे शिक्षण, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासन, जालना जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला आहे. बालविवाह रोखण्यासोबतच मुलींना शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार आंतरराष्ट्रीय बालविवाह प्रतिबंध दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
महिला व बालविकास विभाग, जालना जिल्हा प्रशासन आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 27) जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त वर्षा मुकुंद लड्डा, अपर पोलीस महासंचालक अश्वती दोरजे, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (NFHS-6) आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक असून, त्यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर बालविवाह प्रतिबंधासाठी प्रशासन आणि समाजातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांनी बालविवाह रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला. मुलींना केवळ सहानुभूती दाखविण्याऐवजी त्यांना सक्षम बनविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी बालविवाहाची माहिती वेळेत मिळणे आणि त्यावर तातडीने कारवाई होणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. बालविवाह रोखण्यासाठी केवळ कायद्याची अंमलबजावणी पुरेशी नाही, तर मुलींचे शिक्षण सुरू राहणे, आर्थिक अडचणीच्या काळात तसेच हंगामी स्थलांतराच्या वेळी त्यांच्या कुटुंबांना आवश्यक सहकार्य मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक मुलीचे हक्क आणि आकांक्षा लक्षात घेऊन समाजाने तिला संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त वर्षा मुकुंद लड्डा यांनी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांतील मुलींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली. जालना जिल्ह्यात बालविवाहाच्या घटनांचे प्रमाण अधिक असले, तरी अशा घटनांची नोंद होण्याचे प्रमाणही अधिक आहे, ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. मुलींना शिक्षण, कौशल्य विकास आणि सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने पाठबळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.