राजेश टोपेंनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांना दिले निवेदन; तीर्थपुरी-महाकाळा येथील रुग्णालयांच्या बांधकामासह अंबड-घनसावंगीतील सुविधांचा प्रश्न उपस्थित
जालना | प्रतिनिधी
राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाच आता आपल्या मतदारसंघातील आरोग्य सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विद्यमान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे साकडे घालावे लागले आहे. घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील आरोग्य यंत्रणेचे प्रश्न मांडण्यासाठी टोपे यांनी गुरुवारी जालन्यात आबिटकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल उपस्थित होत्या.
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी आणि अंबड तालुक्यातील महाकाळा येथे प्रत्येकी ५० खाटांची उपजिल्हा रुग्णालये विशेष बाब म्हणून मंजूर झाली आहेत. शासन निर्णय, निधी आणि प्रशासकीय मान्यतेसह निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदारही नियुक्त झाले आहेत. मात्र, अद्याप बांधकाम सुरू झाले नसल्याने दोन्ही रुग्णालयांची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी टोपे यांनी केली.
अंबड आणि घनसावंगी येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमधील मंजूर पदे भरणे, घनसावंगी येथे आयसीयू व पॅरामेडिकल कर्मचारी उपलब्ध करणे, अंबडमध्ये पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, तसेच दोन्ही रुग्णालयांत सीटी स्कॅन आणि एमआरआय यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. आवश्यक संख्येने वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याची मागणीही निवेदनात आहे.
अंबड उपजिल्हा रुग्णालयातील आठ खाटांचे डायलेसिस सेंटर पूर्ववत सुरू ठेवावे, तसेच जालना येथील मनोरुग्णालयासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही टोपे यांनी केली.
मंजुरी आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊनही नवीन रुग्णालयांची बांधकामे सुरू झालेली नाहीत, तर विद्यमान रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ आणि आधुनिक वैद्यकीय सुविधांचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या भेटीनंतर या मागण्यांवर प्रत्यक्ष कार्यवाही कधी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.