४ ते ११ डिसेंबरदरम्यान भव्य यात्रा महोत्सव
जालना (प्रतिनिधी) संतश्रेष्ठ श्री सखाराम महाराज ता. रिसोड जि. वाशिम यांचा १४८ वा पुण्यतिथी उत्सव अर्थात लोणी यात्रा महोत्सव ४ ते ११ डिसेंबर २०२६ या कालावधीत लोणी येथे मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने धार्मिक विधी, पूजन, श्राद्ध, महापंगत, रथयात्रा, पालखी नगर परिक्रमा, ज्ञानेश्वरी पारायण आणि महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रा महोत्सवाची सुरुवात शुक्रवार, ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता गरुड खांब पूजन व स्थापना करून होणार आहे. शनिवार, ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता चांदणी पूजन, तर रविवार, ६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता महापंगतीच्या स्वयंपाकास प्रारंभ होईल. सोमवार, ७ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत श्री सखाराम महाराजांचे श्राद्धविधी पार पडणार आहेत.
८ मुख्य डिसेंबर पुण्यतिथीचा दिवस मंगळवार, ८ डिसेंबर रोजी कार्तिक वद्य अमावस्येला श्री सखाराम महाराजांची पुण्यतिथी साजरी होणार असून, दुपारी ३ वाजता भव्य महापंगतीचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यतिथी व महापंगत हा यात्रा महोत्सवातील मुख्य दिवस असल्याने या दिवशी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. बुधवार, ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता श्रींची रथयात्रा काढण्यात येणार असून, रात्री ९ वाजता श्रींच्या पालखीची नगर परिक्रमा होईल. गुरुवार, १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ज्ञानेश्वरी पारायण, विद्वानांचा सत्कार व बिदागी कार्यक्रम होणार आहे.
महापंगतीच्या शुक्रवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रक्षाळपूजा व महाआरती, तसेच रात्री १० वाजता श्रींची शेज आरती होऊन यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे. या धार्मिक व भक्तिमय सोहळ्यात श्रींचे दर्शन घेण्यासाठी, प्रसादाचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सखाराम महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. लोणी यात्रेच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, परंपरा, श्रद्धा आणि संतस्मृतींचा संगम अनुभवण्यासाठी भाविकांना पर्वणी लाभणार आहे.