मुख्य आरोपीला न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी
जालना - वर्षभरात गुंतवणुकीच्या रकमेच्या तिप्पट परतावा मिळवून देण्याचे आकर्षक आमिष दाखवून शिक्षकासह तब्बल ५० गुंतवणूकदारांची १ कोटी ३२ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मोहम्मद एजाज मोहम्मद रफिक सलाट असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला मुंबईतील वांद्रे येथील निर्मलनगर परिसरातून मध्यरात्री अटक केली. न्यायालयाने आरोपीला तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
‘बाबा ट्रेडिंग’च्या नावाखाली गुंतवणुकीचे आमिष
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मार्केटिंग क्षेत्रात ‘बाबा ट्रेडिंग’ या नावाने व्यवसाय सुरू केला होता. तसेच बाबा ट्रेडिंग आणि एफएमसीजी कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास वर्षभरात गुंतवणुकीच्या रकमेच्या तिप्पट रक्कम परत मिळेल, असे आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले. या आकर्षक परताव्याच्या आश्वासनाला बळी पडून अनेकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले. मात्र, गुंतवणुकीची रक्कम जमा झाल्यानंतर आरोपींनी संपर्क टाळत पलायन केले.
जालना शहरातील शेरसवार नगर येथील रहिवासी व व्यवसायाने शिक्षक असलेले मोहम्मद फेरोज अब्दुल सत्तार, त्यांचे भाऊ आणि त्यांच्या परिचयातील अन्य गुंतवणूकदार अशा एकूण ५० जणांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह एमपीआयडी कायद्याच्या कलम ३, ४ व ५ नुसार तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.
या प्रकरणातील वसीम अहमद अब्दुल गफार (वय ३७, रा. इतवार गल्ली, कचेरी रोड, जुना जालना) आणि मोहम्मद युनूस अहमद मोहम्मद सलीम (वय ३४, रा. इतवार गल्ली, कचेरी रोड, जुना जालना) या दोघांना पोलिसांनी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अटक केली होती. सध्या हे दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य सूत्रधार मोहम्मद एजाज मोहम्मद रफिक सलाट हा फरार होता. विशेष म्हणजे, तो मोबाईल फोनचा वापरही करीत नसल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीदारांच्या माध्यमातून त्याचा माग काढला. आरोपी मुंबईतील वांद्रे परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांची मदत घेत कारवाईचे नियोजन केले.
मुंबईत मध्यरात्री छापा; पाच दिवसांची पोलीस कोठडी
आर्थिक गुन्हे शाखेचे पथक मुंबईतील निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचले. तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब कदम, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळगे आणि त्यांच्या पथकाच्या मदतीने मुख्य आरोपी एजाज सलाट याला रात्री एक वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक तेघबिरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, पोलीस अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, श्रेयस वाघमारे, गोविंद दराडे आणि महिला पोलीस अंमलदार मंदा नाटकर यांनी ही कामगिरी पार पाडली.