जालनाःसत्तर वर्षे जुने असलेल्या लोकमान्य टिळक वाचनालयाचे रूपडे पालटले

अभ्यासिकेचाही समावेश, वायफायसह दर्जेदार सुविधा मात्र जुना ग्रंथसंपदा जपण्याची गरज

Jalna Nayak    03-Nov-2026
Total Views |
 
लोकमान्य टिळक वाचनालय
 
जालनाः शहरातील टाऊन हॉल परिसरात महानगर पालिकेचे सुमारे सत्तर वर्षे जुने लोकमान्य टिळक वाचनालय आहे. या वाचनालयात विपूल ग्रंथसंपदा असून ही ग्रंथ संपदा व ठेवा जपण्याची गरज आहे. या जुन्या अशा वाचनालयाचे रूपडे पालटले असून या नवीन कामाचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी पार पडला.
महापालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांच्या पुढाकारातून शहरातील लोकमान्य टिळक व मोतीबाग जवळील हुतात्मा जनार्दन मामा वाचनालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. युवक-युवतींमध्ये
वाचनाची आवड वाढावी, त्यांना प्रसन्न वातावरण मिळावे म्हणून या वाचनालयास आधुनिक असे स्वरूप देण्यात आले आहे. चकचकीत पणा, खुर्चांची व्यवस्था, संगणक, अभ्यासिका आदींचा येथे समावेश आहे. उपलब्ध जागेत दुमजली व्यवस्था करण्यात आली आहे.
अंदाजे सत्तरवर्षांपेक्षा अधिक जुने वाचनालय असून या ग्रंथालयात अनेक जुने ग्रंथ, पुस्तके, संदर्भ ग्रंथ, खंड असून हे खंड कुठे ठेवले अथवा त्याचे डिजिटायझेशन करण्याची गरज आहे. आज सामाजिक माध्यमांच्या काळात वाचन बंद झाल्यागत असले तरी वाचनाशिवाय पर्याय नाही हे सत्य आहे. वाचनालयातील आधुनिक रूपामुळे वाचक वाचनालयाकडे आर्कर्षित होतील असा विश्वास महानगर पालिकेस आहे.
 

लोकमान्य टिळक वाचनालय  
 
निगराणी महत्त्वाची
आधुनिक करण्यात आलेले वाचनालयाची आता निगराणी आणि देखरेख महत्त्वाची आहे. अन्यथा काही दिवसांत परिस्थिती जैसे थेच व्हायला नको. वाचनालयाच्या ग्रंथपालांची ही जबाबदारी आहे. अन्यथा एखाद्या कर्मचाऱ्यास नेमून ग्रंथापालांनी फिरकू नये असे चित्र नको.