मंठ्यात शासकीय रेशनचा 2,510 किलो धान्यसाठा जप्त

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Jalna Nayak    04-Nov-2026
Total Views |
 
रेशनचा गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात
 
मंठा : शासकीय सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणारा रेशनचा गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारवाईत 2 हजार 510 किलो धान्य आणि महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 5 लाख 72 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि. 4 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा, जालना येथील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंठा ते जिंतूर रोडवरील हेलसवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. यावेळी शासकीय रेशनचा गहू व तांदूळ अवैधरित्या साठवून काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहनातून वाहतूक केला जात असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी कारवाई करत 480 किलो गहू (किंमत 12 हजार रुपये), 2 हजार 30 किलो तांदूळ (किंमत 60 हजार 900 रुपये) तसेच 5 लाख रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक MH-28 AB-4029) असा एकूण 5 लाख 72 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी दत्तात्रय अर्जुन वाघ (वय 27, रा. हेलसवाडी), नितीन भारतराव वडकुते आणि सचिन भारतराव वडकुते (दोघेही रा. मंठा) या तिघांविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 639/2026 नुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत. शासकीय धान्याच्या काळ्या बाजाराविरोधात झालेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.