जालना : जालना तालुक्यातील नंदापूर येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे (स्पार्किंग) लागलेल्या भीषण आगीत किसन निळोबा उबाळे यांच्या घराचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. या आगीत उबाळे कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला असून घरातील धान्य, कपडे, सोन्या-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या घरात दोन कुटुंबे वास्तव्यास होती. त्यामुळे या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर मोठे संकट ओढवले आहे.
या आगीत घरात साठवून ठेवलेला ५० क्विंटल कापूस, ४० क्विंटल सोयाबीन, २५ क्विंटल गहू, १० क्विंटल ज्वारी तसेच विविध खाद्यपदार्थ आणि इतर मौल्यवान वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की, घरातील कोणतीही महत्त्वाची वस्तू शिल्लक राहिली नाही. आयुष्यभर कष्ट करून उभा केलेला संसार क्षणात राख झाल्याने उबाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनरावजी खोतकर यांनी उबाळे कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत तातडीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. या मदतीच्या माध्यमातून संकटाच्या काळात उबाळे कुटुंबाला आधार देण्याचा आणि त्यांना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
युवा सेनेचे महाराष्ट्र सचिव अभिमन्यू खोतकर यांच्या हस्ते देण्यात आली.आज अभिमन्यू खोतकर यांनी या कुटुंबांना भेट दिली नुकसानीची पाहणी केली.याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी रामदासजी दौंड, तहसीलदार राजू निहाळ आणि डीवायएसपी श्री. अनंत कुलकर्णी यांची उपस्थिती होती.यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली. शासनाने देखील या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशा स्वरुपाच्या सुचना आ. खोतकर यांनी प्रशासनाला केल्या.