डिसेंबरनंतर जालन्यातील जनतेला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा करणार - मा.आ.कैलास गोरंटयाल

जनतेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न - भास्कर दानवे

Jalna Nayak    05-Nov-2026
Total Views |
 
भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांनी आज गुरुवारी अंबड येथे पत्रकार परिषदेत दिली.
 
जालना (प्रतिनीधी) जायकवाडी - जालना पाणी पुरवठा योजनेच्या टप्पा - २ अंतर्गत अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रात सुरू असलेले काम जवळपास पूर्ण होत आले असून जालना शहरातील जनतेला डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आठवड्यातून एकदा नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांनी आज गुरुवारी अंबड येथे पत्रकार परिषदेत दिली.
जालना शहरातील जनतेला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी - जालना पाणी पुरवठा योजनेच्या टप्पा -२ अंतर्गत अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रात कामाला आज गुरुवारी माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यासह भाजपाचे जालना शहर महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे,महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, अंबडचे नगराध्यक्ष केदार कुलकर्णी, पाणी पुरवठा सभापती सौ.पूनम स्वामी, नगरसेवक सिद्धिविनायक मुळे,राज स्वामी, जालना मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता तायडे,शहर अभियंता राजेश बगळे आदींनी भेट देऊन पाहणी केली. या पाहणीनंतर जलशुद्धीकरण केंद्रात उपस्थीत पत्रकारांशी संवाद साधतांना गोरंटयाल म्हणाले की, जालना शहरातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आपण आमदार असतांना जायकवाडी - जालना ही ६० एमएलडीची महत्त्वाकांक्षी योजना मंजूर करून घेतली.मात्र या योजनेचे डीपीआर तयार करतांना चुकून २४ एमएलडी झाले. त्यामुळे २० एमएलडी पेक्षा अधिक पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी अडचणी आल्या.या २० एमएलडी पैकी ४ एमएलडी पाणी अंबड नगर पालिका घेते तर योजने दरम्यान असलेल्या डावरगावात मोठया प्रमाणावर पाणी चोरी होते. त्यामुळे जालन्याला दररोज केवळ १२ ते १३ एमएलडी इतकेच पाणी उपलब्ध होते.या पाण्याचा वापर जुना जालना भागातील जनतेसाठी तर घानेवाडी येथील राष्ट्रसंत गाडगे बाबा जलाशयातून नवीन जालन्याला पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु यंदा पावसाने दगा दिल्यामुळे गाडगे बाबा जलाशयातील पाणी साठा कमी झाला असून दुष्काळ असल्यामुळे आगामी काळात पाण्याची होणारी टंचाई लक्षात घेऊन जालना मनपा प्रशासनाने आवश्यक ते नियोजन व उपाययोजना राबवण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचे गोरंटयाल यांनी सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार नारायणराव कुचे,आ.संतोष पाटील दानवे आणि आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी शुद्धीकरण टप्पा - २ योजना आणि घानेवाडी ते जालना येथील जलशुद्धीकरण ही नवीन जलवाहिनी करण्याच्या कामाला मंजुरी देत राज्य सरकारने त्यासाठी तब्बल ७६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगून गोरंटयाल म्हणाले की, त्यापैकी ५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून आतापर्यंत ४६ कोटी रुपये कामावर खर्च झाले आहे.६ कोटी रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होणार असून २७ कोटी रुपये दीर्घकालीन कर्ज स्वरूपात घेण्यात येणार आहे.टप्पा -२ योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून जालना शहराला दररोज ४० एमएलडी पाणी पुरवठा करण्याची तयारी मनपाची आहे. खरं तर टप्पा - २ या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील जनतेला दररोज पाणी पुरवठा करण्याचे आपले स्वप्न होते.परंतु यंदा पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळ पडला असल्याने दररोज पाणी पुरवठा करणे शक्य नाही. आगामी काळात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जालना मनपातर्फे आवश्यक ते नियोजन करण्यात येत दुष्काळी परिस्थितीत देखील शहरातील जनतेला आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
 
जनतेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न - भास्कर दानवे
जालना शहरातील जनतेने प्रथमच झालेल्या जालना मनपाच्या निवडणुकीत भाजपा नेत्यांवर विश्वास टाकून मनपाची सत्ता ताब्यात दिली. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे,माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.नारायणराव कूचे, आ.संतोष पाटील दानवे आणि जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे.अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील टप्पा -२ योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून याद्वारे दररोज किमान ३५ एमएलडी पाणी पुरवठा करता येणार आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सदर काम पूर्ण होताच जालन्यातील जनतेला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा करून जनतेचे ऋण फेडण्याची संधी मिळणार असल्याचे भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी सांगितले.
 
वीज बिलासाठी वर्षाला लागणार तब्बल ३६ कोटी
जायकवाडी - जालना या योजनेद्वारे शहराला दररोज १२ ते १३ एमएलडी पाणी पुरवठा करण्यासाठी वीज बिलावर प्रत्येक महिन्याला सद्यस्थितीत सुमारे १ कोटी रुपये खर्च जालना मनपाला करावा लागत आहे.याच योजनेतून दररोज ४५ एमएलडी पाणी घेतल्यास महिन्याला वीज बीलावर होणारा एक कोटीचा खर्च तब्बल ३ कोटींवर पोहचणार आहे.म्हणजेच वर्षाला वीज बिलावर तब्बल ३६ कोटी रुपये इतका खर्च करावा लागणार असल्याचे स्पष्ट करून घानेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशय परिसरात प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प लवकर कार्यान्वित झाल्यास वीज बिलावर होणार कोट्यवधी रुपयांचा खर्च कमी होण्यास मदत होईल असा विश्वास माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी यावेळी व्यक्त केला.
 
भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांनी आज गुरुवारी अंबड येथे पत्रकार परिषदेत दिली.
 
वर्ल्ड बँकेकडून मिळणार बाराशे कोटींचा निधी
आगामी २५ वर्षातील जालना शहरातील लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठा आणि अंडर ग्राउंड ड्रेनेजचे काम करण्याचा डीपीआर तयार करून तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.अंडर ग्राउंड ड्रेनेजचे काम करण्यास तूर्त नकार दिल्याचे सांगून केवळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी सुमारे बाराशे कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी सकारात्मक असल्याचे सांगून सदरचा निधी हा वर्ल्ड बँकेकडून मिळणार असल्याचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.