जालना/प्रतिनिधी: संस्कृती मंच, जालना च्यावतीने गुरुवार दि. 5 नोव्हेंबर रोजी गोकुळ लॉन्स सभागृहात सकाळी 6 वाजता आयोजित ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमात गीतांच्या सुरेल सुरावटींनी जालनेकर रसिक मंत्रमुग्ध झाले.
संस्कृती मंचच्या दिवाळी पहाट या संगीतमय कार्यक्रमाचे यंदा १९ वे वर्ष होते. पहाटे सहा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका ज्ञानेश्वरी गाडगे आणि गायक राहुल खरे यांनी भक्तिगीते, अभंग, नाट्यसंगीत, भावगीते आणि विविध संगीत प्रकारांतील सुमधुर गीते सादर करून जालनेकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजराने झाली. त्यानंतर ज्ञानेश्वरी गाडगे यांनी ‘सूर निरागस हो’, ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’, ‘सोहम हर डमरू बाजे’ आदी गीतांच्या सादरीकरणातून भक्तिमय वातावरण निर्माण केले. ‘माझे माहेर पंढरी’, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ आणि ‘ऐसी लागी लगन’ या भक्तिगीतांनाही रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. ‘केतकी गुलाब जुई चंपक’ या सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीतावर आधारित गीताने रसिकांना विशेष मोहिनी घातली. तर ‘शुक्रतारा मंद वारा’ या भावगीताने कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली.
भजन मेलडीअंतर्गत राहुल खरे यांनी ‘तू सुखकर्ता’, ‘आकाशी झेप घे’, ‘देव देव्हाऱ्यात नाही’, ‘रुणझुण’, ‘उघड दार देवा’, ‘खेळ मांडियेला’, ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’, ‘केशवा माधवा’, ‘ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले’ आणि ‘झाला महार पंढरीनाथ’ अशी एकापेक्षा एक सरस गीते सादर केली. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
ज्ञानेश्वरी गाडगे यांनी ‘सुरत पिया कीन छिन बिसराई’ या ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकातील संगीत रचनेचे तसेच ‘सूर निरागस हो’ या गीताचे प्रभावी सादरीकरण केले. या गीतांना रसिकांकडून प्रचंड टाळ्यांची दाद मिळाली. राहुल खरे यांनी शेतकऱ्यांची कैफियत मांडणाऱ्या गीतांसह ‘खेळ मांडला’ आणि ‘देवा काळजी रे’ ही गीते सादर करून सामाजिक जाणिवेचीही जाणीव करून दिली. ‘शालू माझा रंगानं भिजला’ या गवळणीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. ‘कानडा राजा पंढरीचा’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर ‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’ या प्रार्थनेने संगीतमय पहाटेचा समारोप करण्यात आला.
पहाटे सहा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला जालनेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. प्रास्ताविक किशोर देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मकरंद दाभाडकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिल कुलकर्णी, दिलीप देशपांडे, श्याम कुलकर्णी, प्रकाश आचार्य, धनंजय पाटील, सुनील कुलकर्णी, संजय देशपांडे, जयंत दाभाडकर, गिरीश राखे, नरेंद्र देशपांडे आणि संदीप देशपांडे यांनी परिश्रम घेतले.संस्कृती मंचच्या १९ व्या दिवाळी पहाट कार्यक्रमाने भक्ती, संगीत आणि सुरेल स्वरांचा अविस्मरणीय अनुभव जालनेकर रसिकांना दिला.