बदनापूर तहसील कार्यालयासमोर चुलीवर बेसन-भाकर बनवून ठाकरे गटाचा सरकारला टोला; हेक्टरी एक लाख दुष्काळी मदतीची मागणी

पाच हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?

Jalna Nayak    06-Nov-2026
Total Views |

बदनापूर तहसील
बदनापूर / प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या दुष्काळी संकटावर सरकारकडून मिळणारी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बदनापूर तहसील कार्यालयासमोर अनोख्या आंदोलनातून सरकारचा निषेध केला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात चुलीवर बेसन-भाकर बनवून आणि काळ्या फिती लावून शिवसैनिकांनी काळी दिवाळी साजरी केली. सरकारच्या तुटपुंज्या मदतीत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
दुष्काळाच्या झळांनी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीतील उत्पन्न घटले असून, हातात पैसा नसताना सण साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशा परिस्थितीत सरकारने दिलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवर दिवाळी साजरी करणे अशक्य असल्याचे आंदोलनकर्त्यांनी अधोरेखित केले. सरकारने शेतकऱ्यांना किमान २५ हजार रुपये अग्रीम मदत द्यावी, तसेच दुष्काळी अनुदानापोटी हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या दुष्काळी वेदना आणि सरकारच्या मदतीतील तुटपुंजीपणा दाखवून देण्यासाठी चुलीवर बेसन-भाकर बनविण्याचे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. काळ्या फिती लावून दिवाळी साजरी करत सरकारच्या धोरणांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जालना जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, किसानसेना जिल्हा संघटक भानुदास घुगे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रूपम घुगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख कारभारी म्हसलेकर,तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, युवासेना तालुकाप्रमुख काकासाहेब ढाकणे, उपतालुकाप्रमुख फैजान मिर्झा, रामेश्वर फंड, संजय जाधव, राहुल जऱ्हाड, अंकुश पवार, बळीराम कोल्हे, गुलजार बेग, फैजान पटेल, लक्ष्मण साळवे, राम म्हसलेकर, गजानन लहाने, ज्ञानेश्वर सौदागर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते