जालना: मुलाचे जन्म प्रमाणपत्र काढून देण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका खाजगी इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), जालना यांच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. मुकेश प्रकाश राठोड (वय ३९, व्यवसाय: मजुरी, रा. शिवनगर, जालना) असे लाच घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारदाराने आपल्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र मिळण्यासाठी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी महानगरपालिका जालना यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांना जन्म प्रमाणपत्र मंजूर झाल्याबाबत ई-मेल प्राप्त झाला होता. मात्र, प्रमाणपत्रात मुलाचे नाव नसल्याने त्यांनी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी महानगरपालिकेत जाऊन विचारणा केली.
तेव्हा तेथील खाजगी इसम मुकेश प्रकाश राठोड याने तक्रारदारास गाठून महानगरपालिकेतील भुरेवाल कर्मचारी आपले ओळखिचे असल्याचे सांगितले आणि काम करून देण्यासाठी १,००० रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ५०० रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली.
५ नोव्हेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी मुकेश प्रकाश राठोड याने ५०० रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले. यानंतर आज, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास महानगरपालिका जालनासमोरील चहा टपरीसमोर पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच स्वीकारताना आरोपीला रंगेहात पकडण्यात आले.या प्रकरणी पोलीस ठाणे कदीम जालना येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.