जालना अन् परतूर रेल्वे स्थानकांवर दलालांचा सुळसुळाट; आरपीएफच्या डोळ्यांवर पट्टी, प्रवाशांची मोठी लूट!

कन्फर्म रिझर्व्हेशनच्या नावाखाली अडीच पट ते तिप्पट अधिक रक्कम वसूल

Jalna Nayak    07-Nov-2026
Total Views |
 
 रेल्वे स्थानकावर तिकीट दलालांचा (एजंट) प्रचंड सुळसुळाट
 
जालना:ऐन दिवाळी सणाच्या काळात जालन्यासह परतूर रेल्वे स्थानकावर तिकीट दलालांचा (एजंट) प्रचंड सुळसुळाट वाढला असून, प्रवाशांची उघडउघड आर्थिक लूट सुरू आहे. कन्फर्म रिझर्व्हेशनच्या नावाखाली अडीच पट ते तिप्पट अधिक रक्कम वसूल केली जात आहे. विशेष म्हणजे प्रवाशांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या 'रेल्वे सुरक्षा बला'चा (RPF) यावर कोणताही वचक राहिला नसून, उलट आरपीएफ कर्मचारी व अधिकारी या दलालांना खतपाणी घालत असल्याचा गंभीर आरोप प्रवाशांमधून केला जात आहे.
 
आरपीएफ आणि दलालांची ‘फिक्सिंग’?
तिकीट काउंटरबाहेर दलाल बिनधास्तपणे प्रवाशांना दमदाटी करत असल्याच्या तक्रारी आहेत. "तुम्हाला जिथे तक्रार करायची तिथे करा, आमचं काहीच बिघडत नाही; आमचा हप्ता थेट आरपीएफ अधिकाऱ्यांपर्यंत जातो," अशी फुशारकी दलाल मारत असल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचे म्हणणे आहे. केवळ दाखवण्यापुरता एखादा आरपीएफ कर्मचारी फेरफटका मारून निघून जातो. या संगनमतामुळे रांगेत तासनतास उभे राहणाऱ्या सामान्य प्रवाशांच्या पदरी मात्र ‘वेटिंग तिकीट’च पडते, तर पैसे फेकणाऱ्यांना तात्काळ कन्फर्म तिकिटे मिळतात.
 
रात्रीच ताबा अन् रांगेत
स्वतःचा नंबर जालना व परतूर स्थानकात एजंटचे हस्तक रात्रीच मुक्कामी असतात. त्यांना बाहेर घालवण्याची जबाबदारी आरपीएफची असतानाही काही ‘आर्थिक देवाणघेवाणी’पोटी त्यांना तिथेच राहू दिले जाते. सकाळी तिकीट खिडकी उघडताच हेच लोक रांगेत पहिला नंबर लावून बसतात. सामान्य प्रवाशांनी यावर आक्षेप घेतल्यास त्यांना आरपीएफ आणि जीआरपी (GRP) यांच्यात फेऱ्या मारायला लावल्या जातात.
 
RPF सांगते: "जीआरपीकडे जाऊन तक्रार करा."GRP सांगते: "आरपीएफकडे तक्रार नोंदवा."या दोन्ही विभागांच्या टोलाटोलीमुळे संतप्त आणि त्रासलेला प्रवासी तक्रार न करता शांत बसणेच पसंत करतो. याच गोष्टीचा फायदा हे दलाल आणि काही भ्रष्ट बुकिंग क्लार्क वर्षानुवर्षे घेत आहेत.कर्मचाऱ्यांची एकाच ठिकाणी ठाण मांडून ड्युटीअनेक बुकिंग क्लार्क आणि सुरक्षा कर्मचारी वर्षानुवर्षे जालना ते परतूर आणि परतूर ते जालना याच पट्ट्यात आलटून-पालटून ड्युटी करत आहेत. यामुळे त्यांचे दलालांशी घट्ट लागेबांधे निर्माण झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या स्टारनुसार हप्त्याची रक्कम ठरते आणि या दलालांवर काही स्थानिक लोकप्रतिनिधींचाही वरदहस्त असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
  
 
नांदेड डिव्हिजन कारवाई करणार का?दिवाळी, दसरा, ईद, ख्रिसमस असो की संक्रांत... प्रत्येक सणासुदीला सामान्य प्रवाशांना प्रवासासाठी खासगी ट्रॅव्हल्स किंवा बसचा महागडा पर्याय निवडावा लागतो. नांदेड डिव्हिजनच्या वरिष्ठांना हा सर्व प्रकार दिसत नाही का? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासन या दलाल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काय कठोर कारवाई करते, याकडे आता सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे.