आठ प्रमुख मागण्यांवर वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन; मागण्या मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
भोकरदन : शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर बँक प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत लेखी आश्वासन दिल्याने समाजसेवक नारायण लोखंडे व विकास जाधव यांनी सुरू केलेले उपोषण स्थगित केले. सातबारा उताऱ्यावरील इतर बँकांचे बोजे, सिबिल अहवालातील अडचणी, पीककर्ज मंजुरी, कर्जमाफीचा लाभ यांसह आठ प्रमुख मागण्यांबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे योग्य अभिप्रायासह प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे बँक प्रशासनाने लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले.
शेतकरी प्रतिनिधींनी बँक प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनात सातबारा उताऱ्यावरील इतर बँकांच्या बोज्यांमुळे पीककर्ज मंजुरीत येणाऱ्या अडचणी दूर करणे, सिबिल अहवालातील त्रुटींमुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास थांबवणे, पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देणे, कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून देणे, मृत शेतकऱ्यांच्या कायदेशीर वारसांना शासकीय व बँकिंग लाभ देणे, बँकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, आर्थिक गैरव्यवहारांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करणे आणि प्रलंबित पीककर्ज प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे, अशा आठ प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या होत्या. या मागण्यांवर बँक प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरात सर्व प्रश्न वरिष्ठ कार्यालय व सक्षम प्राधिकरणाकडे पुढील कार्यवाही आणि मार्गदर्शनासाठी पाठविण्यात येतील, असे नमूद केले आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या सूचना, बँकेचे नियम, रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्त्वे आणि शासनाच्या धोरणांच्या अधीन राहून आवश्यक सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाहीही देण्यात आली.शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मागण्यांवर प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही, तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला.यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक जिल्हाध्यक्ष केशव पाटील जंजाळ, तालुकाध्यक्ष भरत सपाटे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आंगद सहाणे, काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सोपान सपकाळ, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब जाधव, नगरसेवक जहीर कुरेशी, शिक्षक संघटनेचे भगवान देठे सर उपस्थित होते. तसेच एसबीआयचे सहाय्यक व्यवस्थापक सुशील थोरात, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक प्रशांत वाघ, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अमोल जामुंदे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.