शिवरायांच्या पुतळ्याजवळ २५फुटी भगव्या शिवध्वजाचे रोहण

जगदंब प्रतिष्ठानच्यावतीने जालना येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात

Jalna Nayak    07-Nov-2026
Total Views |
 
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक
 
जालना/प्रतिनिधी : जगदंब प्रतिष्ठानच्यावतीने जालना येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात २५ फूट उंचीचा भव्य भगवा ध्वज उभारून ऐतिहासिक 'शिवध्वज महोत्सव' उत्साहात साजरा करण्यात आला. ज्याप्रमाणे दीपोत्सव साजरा केला जातो, त्याच धर्तीवर शहरात पहिल्यांदाच अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ २५ फुटी भगव्या शिवध्वजाचे रोहण करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
शनिवार, दि. ७ रोजी दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि शिवरायांचा जयघोष करत मान्यवरांच्या हस्ते विधिवत ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यात उपमहापौर राजेश राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज हा केवळ एक ध्वज नसून तो स्वाभिमान, रयतेचे राज्य आणि न्यायाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे आपण विविध उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतो, त्याचप्रमाणे शिवरायांच्या स्मारकाजवळ हा २५ फुटी शिवध्वज सदैव फडकत राहून तरुणांना राष्ट्रभक्ती व शिवविचारांची प्रेरणा देत राहील. जगदंब प्रतिष्ठानने घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे.
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे विचार घराघरांत आणि मनामनांत पोहोचवणे काळाची गरज आहे. शिवस्मारकाजवळ अशा भव्य शिवध्वजाची स्थापना होणे ही संपूर्ण जालनेकरांसाठी अभिमानाची बाब असून प्रतिष्ठानचा हा उपक्रम समाजप्रबोधन व ऐक्याला बळ देणारा आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र राऊत यांनी या ऐतिहासिक उपक्रमाचे कौतुक केले आणि शिवकार्यासाठी तरुणांनी नेहमी संघटित होऊन पुढे यावे, असे आवाहन केले. संजय देठे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यास सहनिबंधक संजय देठे, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष शेख इब्राहिम, जिल्हा विशेष शाखेचे पीएसआय सय्यद शौकत, गणेश शिंदे, शुभम कैलासराव राजगुरे, सार्थक पवार, योगेश सोळुंके, अर्जुन गायकवाड, महेश पाटील भुतेकर, मंदार पवार, रोहन खैरे, कल्लासिंग कलानी, शेख मुस्ताक आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, न्यायालयीन कामकाज असल्याने सदर बाजार पोलीस ठाण्याचे पीएसआय सचिन सानप प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र त्यांनी दूरध्वनीवरून या उपक्रमास व जगदंब प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन जगदंब प्रतिष्ठानचे शंभू पाटील व सहकाऱ्यांनी केले. यावेळी परिसरातील शिवप्रेमी नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.