वालसावंगी, पिंपळगाव रेणुकाई, अनवा आणि धावडा येथे लवकरच सुरू होणार 'पोलीस संरक्षण चौकी'

भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाण्यांतर्गत

Jalna Nayak    07-Nov-2026
Total Views |

सचिन खामगळ (सपोनि, पारध पोलीस ठाणे)
विशाल अस्वार
वालसावंगी:भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वालसावंगी, पिंपळगाव रेणुकाई, अनवा आणि धावडा या मोठ्या लोकसंख्येच्या आणि संवेदनशील गावात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या (DG) आदेशानुसार 'पोलीस संरक्षण चौकी' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून गुन्हेगारीवर चाप बसण्यास मदत होणार आहे.
जागा उपलब्धतेसाठी प्रशासनाचे आवाहन
या पोलीस संरक्षण चौकीसाठी संबंधित गावातील ग्रामपंचायतीने शासकीय जागा उपलब्ध करून दिल्यास ती वापरली जाईल. जागा उपलब्ध नसल्यास खासगी जागा भाडेतत्त्वावर घेतली जाणार असून, त्याचे भाडे शासनाकडून थेट जागामालकाला दिले जाईल. त्यामुळे ज्यांच्याकडे योग्य जागा उपलब्ध असेल त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रत्येक चौकीत २४ तास पोलीस कर्मचारी तैनात
नव्याने सुरू होणाऱ्या या प्रत्येक पोलीस चौकीत कायमस्वरूपी १ ते २ पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. गावामध्ये २४ तास पोलिसांची उपस्थिती राहिल्याने अवैध धंदे, वादाचे प्रसंग आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसून शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार आहे.
वेळ अन् पैशांची होणार मोठी बचत
यापूर्वी छोट्या-मोठ्या तक्रारी, भांडणे किंवा एन.सी. (नॉन-कॉग्निटिव्ह) अर्जांसाठी ग्रामस्थांना मैलोनमैल अंतर पार करून पारध पोलीस ठाण्यात जावे लागत होते. मात्र, आता या पोलीस चौकीतच प्राथमिक अर्जांची दखल घेतली जाणार असल्याने नागरिकांचे पोलीस ठाण्यातील फेऱ्या मारणे बंद होईल. यामुळे सामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा या दोन्हीची मोठी बचत होणार आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सचिन खामगळ यांची प्रतिक्रिया:
"पोलीस महासंचालकांच्या सूचनेनुसार पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वालसावंगी, पिंपळगाव रेणुकाई, अनवा आणि धावडा या मुख्य व मोठ्या लोकसंख्येच्या गावांमध्ये पोलीस संरक्षण चौकी सुरू करण्यात येत आहे. यामुळे गावातच तत्काळ पोलीस मदत उपलब्ध होईल. लहान-सहान तक्रारींचे निवारण स्थानिक पातळीवरच शक्य झाल्याने ग्रामस्थांचा वेळ आणि आर्थिक भुर्दंड वाचेल. ग्रामपंचायतींनी अथवा स्थानिकांनी या चौकीसाठी मोकळी किंवा भाडेतत्त्वावरील जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हेच आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे."
— सचिन खामगळ (सपोनि, पारध पोलीस ठाणे)