जालना- जनविरोधी व निष्काळजी सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ आणि संकटात सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी बांधवांच्या वेदनांशी एकरूप होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज(दि८) जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'काळी दिवाळी' साजरी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक डोके, जालना जिल्हाध्यक्ष ( पश्चिम) डेव्हिड घुमारे, पूर्वचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात, जिल्हा महासचिव प्रशांत कसबे, खरात आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाध्यक्ष (पश्चिम ) डेव्हिड घुमारे म्हणाले की, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या नावाखाली राज्य सरकारने दिवाळी सणासाठी 5 हजार रुपये अग्रिम जाहीर केला आहे, केवळ 5 हजार रुपयात दिवाळी सण साजरा कसा करणार हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे. एकीकडे राज्य शासनाने दिवाळीसाठी अग्रिम म्हणून 5 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात टाकले असले तरी अनेक बँका याच अग्रिम मधून शेतकऱ्यांचे कर्ज वसूल करीत आहेत. मायक्रोफायनान्स कंपन्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी नाहक त्रास देत आहेत.हा सर्व प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचे त्यांनी सांगितले . शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी,टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी बोलताना दीपक डोके यांनी राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीत जनावराच्या चाऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी केली. यावेळी रामप्रसाद थोरात, अकबर इनामदार, खालेद चाऊस आदींची भाषणे झाली. यानंतर घोषणाबाजी करीत व चटणी- भाकर खात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काळी दिवाळी साजरी करण्यात आली. आपल्या मागणीबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
या आंदोलनात राजेंद्र खरात, गौतम वाघमारे,दीपक खाजेकर, भानुदास साळवे,किशोर तुपे, हनुमंत मोरे, मिलिंद मुंढे, अंबादास खरात, मिलिंद पारवे, रोहन वाघमारे, मुरली बोबडे, विजय लहाने, शेख जमीरभाई, रविंद्र भदर्गे,गोपाल गावडे यांच्यासह जालना जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते