सर्वसामान्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याचा आमदारांचा संकल्प
बदनापूर : प्रतिनिधी
यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले असून, बळीराजा मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. अशा कठीण परिस्थितीत दिवाळीचा सण प्रत्येकाच्या घरात आनंदाने साजरा व्हावा, या सामाजिक भावनेतून बदनापूर-अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी मतदारसंघातील एक हजार गरीब व गरजू कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात रामखेडा गावातून करण्यात आली.
दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आहे. मात्र, यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतमजूर, हातावर पोट असणारे कुटुंब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसमोरही सण साजरा करण्याचे आव्हान उभे आहे. अशा वेळी गरजू कुटुंबांच्या आनंदात सहभागी होण्याच्या उद्देशाने आमदार नारायण कुचे यांनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी आमदार नारायण कुचे म्हणाले की, राज्याच्या मंत्रिमंडळाने यंदाची दिवाळी शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि गरजू कुटुंबांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देणे ही सरकारची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिक अडचणीत असताना त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. त्यामुळेच आम्ही शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.
रामखेडा येथून सुरू झालेला हा उपक्रम बदनापूर-अंबड विधानसभा मतदारसंघातील एक हजार गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहे. आर्थिक संकटाच्या काळात दिवाळीच्या निमित्ताने मिळणारा हा किराणा किटचा आधार गरजू कुटुंबांसाठी दिलासादायक ठरणार आहे.