मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्यानेमराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते संतप्त

आभारपत्र देण्यासाठी उत्सुक असलेले कार्यकर्ते निराश होऊन परतले

Jalna Nayak    14-Aug-2026
Total Views |

कार्यकर्ते आभारपत्र न देताच खाली हाताने निराश होऊन परतले.
जालना/प्रतिनिधी: आडमुठे भूमिका घेणारे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांची केलेली बदली आणि मराठा-कुणबी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक भूमिका घेत असल्याने मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने त्यांना जालना दौऱ्यादरम्यान आभारपत्र देऊ इच्छिणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाला भेट नाकारण्यात आली. एरव्ही आंदोलनात्मक भूमिकेत असणारा मराठा महासंघ फक्त आभार पत्र देण्यासाठी वेळ मागत असल्याची जाणीव पोलीस प्रशासनाला असतानाही त्यांनीही या भेटीची योग्य मांडणी केली नाही, त्यामुळे मुख्यमंत्री व प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करून कार्यकर्ते आभारपत्र न देताच खाली हाताने निराश होऊन परतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जालना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्यासह एटीएस, गोपनीय शाखेच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी संपर्क साधून आंदोलनाबाबत विचारणा केली असता, आंदोलन वगैरे काहीही नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्या आडमुठे धोरणाबाबत ठिकठिकाणी तक्रारी करण्यात आल्याने, नरेंद्र पाटील यांनी ही व्यथा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडली होती. त्याची दखल घेत श्री. फडणवीस यांनी त्यांची तात्काळ बदली करून आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नियुक्ती केल्याने तसेच मराठा-कुणबी वादावर तोडगा काढून दोन जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून सकारात्मक प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद व आभारपत्र द्यायचे आहे, असे पोलीस प्रशासनाला सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज शुक्रवार दि. 14 ऑगस्ट सकाळी मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक अशोक पडूळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तीत जाऊन आपले आभारपत्र निर्णय घेतला होता. प्रशासनाच्या सूचनेनुसार आणि पोलिसांच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पत्र देण्यासाठी वेळ मागितली होती. परंतु, ऐनवेळी भेट नाकारण्यात आल्यामुळे कार्यकर्ते आभारपत्र न देताच निराश होऊन परतले.
मराठा क्रांती मोर्चा ही संघटना आक्रमक आंदोलक म्हणून ओळखली जात असली, तरीही कोणताही गोंधळ किंवा काळे झेंडे दाखवण्यासारखा अनुचित प्रकार घडू नये म्हणून कार्यकर्त्यांनी पूर्णपणे प्रशासकीय नियमांचे पालन करत शांततापूर्ण मार्गाचा अवलंब केला होता. शासन व प्रशासनाकडून वेळ व दाद न मिळाल्यामुळे, आम्ही जर शिस्तीचे पालन केले नसते, तर वेगळे चित्र पाहायला मिळाले असते, अशी प्रतिक्रिया अशोक पडूळ यांनी दिली. मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना, अभिनंदन व आभार मानण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला भेट न देणे दुर्दैवी आहे. तसेच प्रशासनाने जर योग्य वेळी समन्वय साधून दोन मिनिटांची जरी वेळ दिली असती तर आम्हाला आमचे म्हणणे मानता आले असते. शिस्त पाळूनही प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये शासनाविर्षयी तीव्र संताप व्यक्त असल्याचे श्री. पडूळ म्हणाले.