कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या १५ गोवंश जनावरांची सुटका; बदनापूर पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल; १ लाख ६७ हजार रुपयांचा गोवंश जप्त

Jalna Nayak    14-Aug-2026
Total Views |

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या १५ गोवंश जनावरांची सुटका
बदनापूर, दि. १४ (प्रतिनिधी किशोर सिरसाठ) : कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या नेण्यात येत असल्याचा संशय असलेल्या १५ गोवंश जनावरांची बदनापूर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत सुटका केली. गेवराई बाजार परिसरातील बाजारतळावरील शेडमध्ये ही जनावरे आढळून आली. या प्रकरणी जालना शहरातील चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदनापूरचे पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांना गुप्त बातमीदारामार्फत गेवराई बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर गोवंश जनावरे कत्तलीसाठी जमा करण्यात आल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून त्यांनी तातडीने पोलिसांचे पथक तयार केले. पथकाने गुरुवारी रात्री उशिरा गेवराई बाजारतळ परिसरातील एका शेडवर छापा टाकला.
या कारवाईदरम्यान शेडमध्ये १५ गोवंश जनावरे आढळून आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही जनावरे चारा-पाण्याविना तसेच आखूड दोरीने बांधलेल्या अवस्थेत ठेवण्यात आली होती. जनावरांबाबत मालकी हक्काचे आवश्यक दाखले किंवा पुरावे उपलब्ध नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून सर्व जनावरे ताब्यात घेतली.पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार जप्त करण्यात आलेल्या १५ गोवंश जनावरांची अंदाजित किंमत १ लाख ६७ हजार रुपये आहे. कारवाईनंतर सर्व जनावरांना काजळा येथील गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी शेख शकील शेख बासिद, शेख कलीम शेख बडे भाई, शेख गनी अब्दुल रहीम आणि शेख सलीम शेख गुलाब (सर्व रा. मिल्लतनगर, जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनावरांना कत्तलीसाठी नेण्याचा उद्देश होता का, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, बदनापूर पोलिसांकडून अशा प्रकारच्या अवैध वाहतूक व गोवंशासंदर्भातील गैरप्रकारांविरोधात यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांनी सांगितले.ही कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे, पोहेका/१३५१ रणजीत मोरे, पोहेका/६७१ अंकुश दासर, पोहेका नितीन वाघमारे आणि पोका/८८७ रामेश्वर सानप यांच्या पथकाने केली.