रेशीम शेतीतील योगदानाबद्दल भाऊसाहेब निवदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

रयतेचे स्वराज्य प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पुढाकार

Jalna Nayak    14-Aug-2026
Total Views |

रेशीम शेतीतील योगदानाबद्दल भाऊसाहेब निवदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानघनसावंगी- अविनाश घोगरे
रेशीम शेतीला चालना देत परिसरातील शेतकऱ्यांना रेशीम कीटक संगोपनाकडे वळविण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील शेतकरी भाऊसाहेब निवदे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जालना येथे शुक्रवारी (दि. १४) रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रेशीम शेतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल निवदे यांना सन्मानित करण्यात आले.
रयतेचे स्वराज्य प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून भाऊसाहेब निवदे यांनी रेशीम कीटक संगोपनाची शास्त्रशुद्ध पद्धत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. रेशीम उत्पादन वाढविण्यासोबतच परिसरातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळावे, यासाठी त्यांनी सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. त्यांच्या या कार्यामुळे परिसरात रेशीम शेतीला चालना मिळण्यास मदत झाली.रेशीम शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत हा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास पालकमंत्री पंकजा मुंडे, मंत्री संजय सावकारे, महाराष्ट्राचे उपसंचालक महेंद्र ढवळे, जिल्हा रेशीम अधिकारी अजय मोहिते यांच्यासह विक्रम काळे, वंदना मगरे, डॉ. कल्याण काळे, संजय जाधव, संतोष चव्हाण, सुशांत शिंदशार, बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, नारायण कुचे, संतोष दानवे आणि हिकमत उढाण आदींची उपस्थिती होती.
हा सन्मान माझा नव्हे, रेशीम उत्पादकांचा
सन्मानानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाऊसाहेब निवदे म्हणाले की, हा गौरव केवळ माझा नसून रेशीम शेती करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचा आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी यापुढेही प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.