जालना :शहरातील संभाजी नगर परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २ हजार ५०० रुपये किमतीच्या दोन तलवारी जप्त केल्या. ही कारवाई मंगळवारी (दि. १८) करण्यात आली.
जालना जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेजस्वी सिंग संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात शोधमोहीम सुरू केली होती.
दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रोहित दिनेश राजपूत (वय १९, रा. ओम शांती गल्ली, संभाजी नगर, जालना) याच्याकडे अवैध शस्त्र असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो संभाजी नगर परिसरातील राहत्या घरी मिळून आला. त्याच्याकडून १ हजार ५०० रुपये किमतीची एक तलवार जप्त करण्यात आली.पोलिसांनी अधिक चौकशी केली असता रोहितचा मित्र आदित्य सुरेश साळुंके (वय २०, रा. तीन मंदिर गल्ली, संभाजी नगर, जालना) याच्याकडेही तलवार असल्याची माहिती मिळाली. त्याचा शोध घेतला असता तो स्वामी समर्थ वेल्डिंग दुकान, सागर गल्ली, भोकरदन नाका परिसरात मिळून आला. त्याच्याकडून १ हजार रुपये किमतीची एक तलवार जप्त करण्यात आली.
दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कदीम बाजार पोलीस ठाणे, जालना येथे हजर करण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार गोपाळ गोसावी, लक्ष्मीकांत आडपे, शिवप्रसाद एखंडे, बाबासाहेब गायकवाड, कैलास चेक, योगेश सहाने, सागर वाघिस्कर व दत्ता वाघुंडे यांनी केली.