जालना येथे सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय संतगोविंददेव गिरीजी यांची भागवत कथा

कथेच्या जनसंपर्क कार्यालयाचे दत्ता महाराज गोंदीकर व विनायक महाराज फुलंब्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन

Jalna Nayak    18-Aug-2026
Total Views |

स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या वाणीतून भव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन
 
जालना : भक्ती ज्ञानगंगा श्रीमद् भागवत कथा समितीच्यावतीने जालन्यातील मंठा रोडवरील आईसाहेब लॉन्समध्ये 20 ते 26 सप्टेंबरदरम्यान आयोध्यातील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष तथा श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास मथुराचे उपाध्यक्ष प. पू. राष्ट्रीय संत गुरुदेव स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या वाणीतून भव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवार दि. 16 ऑगस्ट रोजी संभाजीनगर प्रभागातील राजुरी कॉर्नरजवळ (भाजपा कार्यालयाच्या पाठीमागे) भक्तिमय वातावरणात ह. भ. प. भागवताचार्य दत्ता महाराज गोंदीकर आणि वे. शा. सं. विनायक महाराज फुलंब्रीकर यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले. यावेळी उद्घाटनपर आशीर्वाचनात गोंदेकर महाराज म्हणाले की, श्रीमद् भागवत कथा ही मानवाच्या आत्मिक कल्याणाचा आणि मोक्षाचा सर्वोत्तम मार्ग आहे. ज्याप्रमाणे राजा परीक्षिताने या कथेचे श्रवण करून आपल्या मोक्षाचे साधन केले, अगदी त्याचप्रमाणे प्रौष्ठपदी पर्वामध्ये जालनेकरांना पूज्यपाद गुरुदेव गोविंददेव गिरीजी महाराजांच्या अमृतवाणीतून कथेचा लाभ मिळणे हे परम आहे. हे आयोजन अत्यंत यशस्वी आणि निर्विघ्न पार पडो, असा आमचा शुभ आशीर्वाद आहे. विनायक महाराज म्हणाले की, श्रीमद् भागवत हे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचे वाङ्मयी स्वरूप आहे. ज्याप्रमाणे राजा परीक्षिताने या कथेचे श्रवण करून मोक्षाची प्राप्ती केली, त्याचप्रमाणे या पवित्र प्रौष्ठपदी पर्वामध्ये जालनेकरांना गोविंददेव गिरीजी महाराजांच्या ओजस्वी व अमृततुल्य वाणीतून ही कथा ऐकण्याचे परम भाग्य लाभत आहे. ही केवळ कथा नसून मानवी जीवनाला संस्कारित व उन्नत करणारा वैदिक ज्ञानयज्ञ आहे. भक्ती ज्ञानगंगा समितीचे हे दिव्य कार्य जालना नगरीला अध्यात्म आणि संतांच्या कृपेने समृद्ध करेल, असे ते म्हणाले.याप्रसंगी श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे मुख्य यजमान विष्णूकुमार चेचानी, माहेश्वरी समाजाचे प्रदेश कोषाध्यक्ष संजय दाड, दैनिक यजमान विजय राठी, सीए डॉ. नितीन तोतला, रामजी उपाध्याय, अनिल पंच, नितीन बागडी, माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष दामोधर बजाज, सचिव दिलीप चेचानी, शहराध्यक्ष विजय राठी, सचिव उमेश बजाज, सत्यनारायण सारडा, लक्ष्मीनारायण मानधना, राजेंद्र मंत्री, दिनेश भक्कड, निलेश चेचानी, विजय चेचानी, निखिल चेचानी, माधव चेचानी, सुनिल बियाणी, धनंजय झंवर, दीपक सोमानी यांच्यासह जालना शहरातील विविध सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जालना शहरात परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या मुखारविंदातून प्रथमच भव्य श्रीमद् भागवत कथेचे आयोजन होणे, हे आपल्या संपूर्ण शहरासाठी अत्यंत अभिमानाची व सौभाग्याची बाब आहे. भाविकांना या दिव्य ज्ञानगंगेचा सहज लाभ घेता यावा हाच आमचा मुख्य उद्देश असून, कथेची वेळ दररोज दुपारी २ ते सायंकाळी ६ अशी आहे. मराठवाड्यात असलेल्या स्वामींच्या शिष्य परिवारांसह जालना शहरातील भाविकांनी या ऐतिहासिक व पवित्र कथेचे श्रवण करून आपले जीवन धन्य करावे, असे आवाहन श्री चेचानी यांच्यासह भक्ती ज्ञानगंगा श्रीमद् भागवत कथा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.