विक्रमी पाणीपट्टी वसुली करणाऱ्या चार पाणी वापर संस्थांचा स्वातंत्र्यदिनी गौरव

पाणी पाळीचे उत्कृष्ट नियोजन व कार्यक्षम व्यवस्थापनाबद्दल सन्मान

Jalna Nayak    18-Aug-2026
Total Views |
 
पाणी वापर संस्थांचा स्वातंत्र्यदिनी गौरव करण्यात आला.
 
घनसावंगी, प्रतिनिधी : जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या पैठण डावा कालवा अंतर्गत मार्च २०२६ अखेर शासनास विक्रमी पाणीपट्टी वसुली करून देतानाच पाणी पाळीचे उत्कृष्ट नियोजन आणि उपलब्ध पाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापन करणाऱ्या चार पाणी वापर संस्थांचा स्वातंत्र्यदिनी गौरव करण्यात आला.
१५ ऑगस्ट रोजी कार्यकारी अभियंता गणेश हासे यांच्या हस्ते संबंधित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना गौरव प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. वितरिका क्रमांक २४ वरील गोदावरी पाणी वापर संस्थेचे गणेश पघळ, जलसमृद्धी पाणी वापर संस्थेचे राजेंद्र परदेशी, वितरिका क्रमांक २३ वरील कपिलेश्वर पाणी वापर संस्थेचे लक्ष्मण कोपरे तसेच वितरिका क्रमांक ४० गोळेगाव येथील गोखलेश्वर पाणी वापर संस्थेच्या मंजू देवकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या चारही संस्थांनी तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत विक्रमी पाणीपट्टी वसुली करून ती शासनाकडे जमा केली. त्याचबरोबर पाणी पाळीच्या कालावधीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, शेतकऱ्यांना पाणीवाटपाचे व्यवस्थापन आणि पाण्याचा कार्यक्षम वापर केल्याबद्दल त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यात आली.यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी भास्कर बोबडे यांचाही सत्कार करण्यात आला. पाणी वापर संस्थांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासोबतच पाणीपट्टी परताव्याची रक्कम लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी सांगितले. पाणी वापर संस्था अधिक सक्षम होण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.जायकवाडी पाटबंधारे विभागांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाणी वापर संस्थांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी पात्र ठरविण्याच्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असेही हासे यांनी स्पष्ट केले.यावेळी उपअभियंता श्री. सारडा, शाखाधिकारी नागराज कटकधोंड, कार्यालयीन अधिकारी संकेत पाटील, उद्धव काटे, भागवत घाडगे, किरण पिंगळे, अक्षय मुळे, शिवम लहामगे, जगदीश हेमके, कैलास दुटे आदी उपस्थित होते.