जालन्यात नवनाथ वाघमारे यांना धमकीप्रकरणी सकल ओबीसी समाजाचा मोर्चा

"आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही"

Jalna Nayak    19-Aug-2026
Total Views |
 
नवनाथ वाघमारे यांना वाय-प्लस दर्जाची सुरक्षा द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
 
जालना- ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करत सकल ओबीसी समाजाच्या वतीने बुधवारी जालन्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. मोर्चानंतर पोलीस अधीक्षकांना निवेदन देत संबंधित आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, आरोपींना अटक करावी तसेच नवनाथ वाघमारे यांना वाय-प्लस दर्जाची सुरक्षा द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
ओबीसी समाजाने दिलेल्या निवेदनानुसार, १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान काही व्यक्ती जालना शहरातील निलम नगर, रेल्वे स्थानकाजवळील नवनाथ वाघमारे यांच्या निवासस्थानी आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावेळी वाघमारे घरी नसल्याने संबंधितांनी त्यांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांच्या आई व बहिणीला अश्लील शिवीगाळ करत, जिथे भेटशील तिथे जिवंत मारून टाकू, अशी धमकी दिल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. यापूर्वीही मंत्रालय परिसरातील बाळासाहेब भवनासमोर काही व्यक्तींनी नवनाथ वाघमारे यांच्यावर अश्लील शिवीगाळ करून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात संतप्त समाजबांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात निवेदनालाच फिर्याद मानून गुन्हा दाखल करावा, आरोपींना तात्काळ अटक करावी आणि नवनाथ वाघमारे यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला लक्ष्य करून त्याच्या कुटुंबीयांना धमकावणे ही लोकशाहीसाठी चिंताजनक बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भविष्यात नवनाथ वाघमारे यांच्या जीवितास कोणतीही हानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही समाजाच्या वतीने देण्यात आला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आली.