जालना : आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, तसेच बंद पथदिवे तात्काळ सुरू करून शहर स्वच्छता अबाधित ठेवण्याचे निर्देश आज मंगळवारी (दि. १८) आयोजित बैठकीत महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांनी दिले आहेत.
श्रावण महिना, श्रीगणेशोत्सव, दुर्गामाता उत्सव आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील नागरी सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महापालिकेत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महापौर वंदनाताई मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत बोलत होते. सणासुदीच्या काळात नागरिकांना मूलभूत सुविधा सुरळीत मिळाव्यात आणि शहर स्वच्छ व सुंदर राहावे, यासाठी प्रशासनाने तात्काळ प्रभावी उपाय-योजना कराव्यात, असे सूचनावजा आदेश देत उभयतांनी रस्ते व पायाभूत सुविधा, शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करणे, उखडलेले पेव्हर ब्लॉक पुन्हा बसवणे आणि नाल्यांवरील तुटलेले ढापे तातडीने बसवून घेण्यास सांगितले. शिवाय शहरातील बंद असलेले पथदिवे आणि हायमास्ट दिवे युद्धपातळीवर दुरुस्त करून रात्रीच्या वेळी शहर प्रकाशमय राहील याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने घंटागाड्यांच्या संख्येत वाढ करणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून दैनंदिन स्वच्छता चोख ठेवणे, तसेच शहरात नियमित औषध फवारणी करण्याच्या सक्त सूचनाही देण्यात आल्या. अनेक दिवसांचा ज्वलंत प्रश्न म्हणजे शहरातील रस्त्यांवरील मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचनांबरोबरच, छत्रपती संभाजी उद्यान परिसरातील वाहन पार्किंगचे योग्य नियोजन करणे आणि शहरात व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्याबाबतही त्यांनी विविध विभाग प्रमुखांना निर्देश दिले. यावेळी उपायुक्त त्र्यंबक कांबळे, उपायुक्त नंदा गायकवाड, नगर सचिव केशव कानपुडे, सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण, सार्वजनिक बांधकाम अभियंता सय्यद सउद, पाणीपुरवठा अभियंता राजेश बगळे, विद्युत अभियंता श्रीमती गावंडे यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.