घनसावंगी : अविनाश घोगरे
शिवरे येथील घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच राज्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. सुरक्षेबाबत शासन स्तरावर ठोस निर्णय होईपर्यंत ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. प्रत्येक ग्रामसभेच्या वेळी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, ग्रामसभेदरम्यान होणाऱ्या अनधिकृत व्हिडिओ चित्रीकरणासह सोशल मीडिया लाइव्हवर कायदेशीर निर्बंध आणावेत, तसेच ग्रामसभेतील उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा घालावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.याशिवाय इतर शासकीय विभागांच्या योजनांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फतच घेण्यात याव्यात. ग्रामसभा स्तरावर होणाऱ्या लाभार्थी निवडीची अंतिम छाननी पंचायत समिती स्तरावरून करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.या मागण्यांवर तातडीने योग्य ती कार्यवाही करून निवेदन शासन स्तरावर पाठवावे, अशी विनंती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी प्रगती इंगवले यांच्याकडे केली.निवेदन देताना तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष बी. बी. गोल्डे, सचिव डी. एल. लहामगे, संघटक डी. बी. गणकवार, एस. एन. मघाडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेदरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर मानसिक तणावामुळे ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा घनसावंगी तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने तीव्र निषेध नोंदविला. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या आदेशानुसार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रगती इंगवले यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.