उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माजी आमदार शिवाजी चोथे यांची भेट
अंबड तालुक्यातील विकासकामांसह विविध प्रश्नांवर चर्चा; विनायक चोथे यांच्याकडून कार्याचा अहवाल सादर
Jalna Nayak 20-Aug-2026
Total Views |
घनसावंगी - मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा पवार यांची अंबडचे माजी आमदार शिवाजी चोथे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी अंबड तालुक्यातील विविध विकासकामांसह नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विनायक चोथे यांनी आपल्या आजवरच्या राजकीय, सामाजिक, सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा पुस्तक स्वरूपातील अहवाल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सादर केला.यावेळी माजी आमदार शिवाजी चोथे यांनी अंबड तालुक्यातील प्रस्तावित विकासकामांना गती देण्याची मागणी केली. तसेच अल्पसंख्याक वस्त्यांमधील विकासकामे, सर्वसामान्य नागरिकांना घरकुल योजनांचा निधी मिळण्यास होत असलेली दिरंगाई, पीक कर्जमाफीच्या यादीतील त्रुटी आदी प्रश्नांकडेही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.याशिवाय महायुतीतील जिल्हा व तालुका पातळीवरील सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभागाबाबत मित्रपक्षांकडून होत असलेल्या कथित हेळसांडीचाही मुद्दा माजी आमदार चोथे यांनी उपस्थित केला. या विविध प्रश्नांबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली.यावेळी अंबड नगर परिषदेचे नगरसेवक रामशेठ लांडे, तालुकाध्यक्ष सतीश धुपे, शहराध्यक्ष नंदकिशोर पुंड, युवक तालुकाध्यक्ष अभिजित खटके आदी उपस्थित होते.