जालना : डिजिटल जमान्यात' सकरुबा' लोकसंस्कृती- परंपरेचे जतन

कुंबेफळ सिंदखेड गावातील महिलांचा उत्साह

Jalna Nayak    20-Aug-2026
Total Views |

मराठवाडा, विदर्भातील खेडोपाडी ही लोकपरंपरा जोपासली जात आहे,हे विशेष....
सुहास सदाव्रते
जालना : एकीकडे डिजिटल अन एआयच्या जमान्यात समाज माध्यमांचा प्रभाव आहे, तर दुसरीकडे खेडोपाडी लोकसंस्कृती आणि परंपरा जोपासत ' सकरुबा ' पूजन केले जाते. आषाढ, श्रावण आणि भाद्रपद या महिन्यादरम्यान मराठवाडा, विदर्भातील खेडोपाडी ही लोकपरंपरा जोपासली जात आहे,हे विशेष....
मराठवाडा आणि विदर्भातील अनेक गावोगावी लोकपरंपरेतील सकरुबा आणि भुलबाईचा उत्सव आजही साजरा केला जात आहे. ​भाद्रपद ते आश्विन कोजागिरी पौर्णिमा या काळात महिला सकरुबा आणि मुली भुलाबाई (गौरी-शंकर) बसवतात. सध्या खेडोपाडी सकरुबा ही लोक परंपरा जोपासली जात आहे. सकरुबाच्या गाण्यांतून घरातील दिरा-भावजयीचे, भावा-बहिणीचे किंवा लहानांच्या खोड्यांचे नाते उलगडते. सकरुबावर आधारित गाणी ही कोणत्याही लिखित ग्रंथातील नसून पिढ्यानपिढ्या तोंडी परंपरेने ओवी,लोकगीत स्वरूपात जपली गेलेली आहेत.
​"अडकित्ता जाऊ दे, सुपारी येऊ दे,
सकरुबाच्या लग्नाला, गाडी फिरू दे..."
सकरुबा कसा वेगवेगळ्या पदार्थांची मागणी करतो आणि मुली त्याला कसा प्रतिसाद देतात, याचे वर्णन काही गाण्यांतून येते. सकरुबाला 'मोदक-खीर', किंवा गुळ-खोबरे असा प्रसाद ठेवण्याची परंपरा दिसून येते. पूर्वीच्या काळात घरातील स्त्रियांना आणि लहान मुलींना मोकळेपणाने हसण्या खेळण्याचा वाव कमी असे. भुलाबाई उत्सव आणि सकरुबासारख्या पात्रांवर गायली जाणारी विनोदी गाणी स्त्रियांना आनंद आणि अभिव्यक्तीचे मोकळे आकाश खुले होते. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी नागदेवतेच्या प्रतिकात्मक मातीच्या राजवाड्याचे (वारूळाची माती आणून) विसर्जन किंवा पूजन करण्याची प्रथा आहे. याला मराठवाड्यात काही भागात 'सकरूंबा' असेही म्हणतात. गावातील काही भगिनी आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नवसाचा सकरुंबा (मातीचा राजवाडा) एक ते पाच वर्षे हा नवस फेडतात. या दिवशी वारूळाची माती आणून राजवाडा बनवणे आणि त्यात विविध धान्ये अर्पण करून शेती व निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी वारूळाची माती वाजतगाजत आणली जाती. बांबूच्या कामठ्या व माती वापरून सुंदर राजवाडा (घर) तयार केला जातो. या मातीच्या राजवाड्यात विविध प्रकारची धान्ये आणि गोड पदार्थ ठेवले जातात.हा विधी शेतीची समृद्धी, पाऊस आणि निसर्गातील जिवांचे रक्षण करण्यासाठी केला जातो.
जालना तालुक्यातील कुंबेफळ (सिंदखेड) या गावातील महिलांनी मंगळवारी सकरुबा पूजन करीत फेर धरीत लोकगीते सादर करीत लोकपरंपरा जपली आहे. या लोकोत्सवात लंका खरात, कविता खरात,नीता खरात, गीता वैद्य,ताराबाई चव्हाण,
माजी सरपंच विमल खरात,अंजुबाई खरात, चंद्रभागा ढाकणे,सरस्वती खरात,ज्योती खरात,कमल चव्हाण,कौशल्याबाई ढाकणे,कौशल्याबाई खरात, रेणूका खरात,चंद्रकलाबाई खरात,मंदा खरात,शामा वाघमारे,अनसूया जाधव, अनसूया खांडेभराड यांनी गावातील मंदिरात तीन तास सकरुबा पूजन करीत जागर मांडला आहे..
 
आमच्या गावात आम्ही कालच सकरुबा पूजन केले. आमच्या सासूबाई कांचनबाई खांडेभराड यांनीही अनेक वर्षांपासून ही परंपरा जपली आहे. शेतीमातीशी कृतज्ञता मानणारा हा खेड्यात चालणारा एक आनंदाचा उत्सव आहे.

अनसूया मैनाजी खांडेभराड
वाघ्रुळ जहागीर
लोकसंस्कृती अन परंपरा जतन करीत कुंबेफळ सिंदखेड येथील ज्येष्ठ ग्रामस्थ तुकाराम वैद्य यांनी वयाची ६५ वर्ष ओलांडली आहे. या वयातही त्यांचा उत्साह आणि विनामोबदला सहकार्य करण्याची भूमिका प्रेरणादायी अशी आहे.
सकरुबा राजवाडा तयार करण्यासाठी १९ वर्षीय हरिओम खरात या युवकाने ही लोकपरंपरा आजच्या डिजिटल जमान्यात जोपासली आहे,हे विशेष होय..